वर्धा: जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळजोडणीकरिता मागणीपत्रापेक्षा अतिरिक्त रक्कम उकळण्यात आल्याचा प्रकार समुद्रपूर तालुक्यातील तरोडा ग्रामपंचायतीत उजेडात आला आहे. या अनागोंदी कारभाराची जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
उन्हाळ्यात जिल्ह्याच्या अनेक ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई असते. तर अनेक भागात ग्रामस्थांना अशुद्ध पाणीपुरवठा होतो.पाण्यासाठी रणरणत्या उन्हात ग्रामस्थांना दाहीदिशा अटकंती करावी लागते. ग्रामस्थांची पाण्यासाठी ही वणवण थांबविण्याकरिता जलजीवन मिशन ही महत्त्वपुर्ण योजना केंद्र शासनाने अंमलात आणली आहे. ग्रामीण भागामध्ये शुद्ध व पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे याकरिता हे मिशन हाती घेण्यात आले आहे. योजनेअंतर्गत २०२४ पर्यत ‘हर घर नल से जल’ हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवण्यात आले आहे. या योजनेसाठी केंद्र शासनाकडून ५० टक्के आणि राज्य शासनाकडून ५० टक्के आणि १० टक्के लोकवर्गणी अशी निधीची उपलब्धता राहणार आहे.
समुद्रपूर तालुक्यातील तरोडा ग्रामपंचायतीत या योजनेअंतर्गत नळजोडणीकरिता नोंदणी सुरू झाली असून डिमांड (मागणीपत्र)ची रक्कम भरण्यास लावले जात आहे. मात्र, कुणाकडून २००० कुणाकडून 3 हजार १०० तर कुणाकडून 3 हजार ४०० रुपये उकळण्यात आले आहे. तशी रीतसर पावतीही देण्यात आली आहे. मात्र, डिमांडच्या रकमेत मोठी तफावत असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत होणाऱ्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.