तुमचे नाव यादीत नाही! तुम्हाला धान्यदेखील मिळणार नाही; कुटुंबीय रेशनच्या धान्यापासून वंचित

रोहणा : नजीकच्या मारडा गावातील काही कुटुंबांना गावातील स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळतेय तर काहींना दुकानचालक तुमचे नाव यादीत नसल्याने तुम्हाला धान्य देता येणार नाही, असे सांगून हकलून लावत आहे. मात्र. ही बाब न्यायोचित नसून गावातील संपूर्ण ९२ कुटुंबांनाही गावातीलच दुकानातून धान्य मिळावे, अशी मागणी गावकऱयांकडून केल्या जात आहे.

मारडा येथील स्वस्त धान्य दुकान रोहणा येथील संचालकाकडे होते. मात्र, रोहण्यावरुन धान्याचा माल आणणे सोयीचे नसल्याने गावातच दुकान असावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. तहसील कार्यालयाकडून मागणीची पूर्तता करुन गावातीलच एका एजन्सीला स्वस्त दुकान चालविण्याची परवानगी दिली. गावात दुकान सुरु झाले. मात्र, नव्याने सुरु झालेल्या स्वस्त धान्य दुकानचालकाने मागील महिन्यात केवळ 33 कुटुंबांना धान्य वाटप केले.

उर्वरित कुटुंबांची नावे माझ्या यादीत नाही, हे कारण पुढे करीत धान्य देण्यास थेट नकार दिला. परिणामी अनेक कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या धान्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे तहसील कार्यालयाने अर्धवट यादी दिली की नवीन दुकानदाराने पूर्ण यादी आणण्यात चूक केली, हे तपासण्याची गरज आहे. सर्वच कुटुंबांना गावात असलेल्या स्वस्त धान्य दुकानातूनच धान्य मिळावे, अशी मागणी गावकऱयांकडून करण्यात येत आहे. तसेच मागील महिन्यात ज्यांना धान्य मिळाले नाही, त्यांना दोन महिन्याचा माल द्यावा, अशी मागणीही रेटून धरण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here