वर्धा : नक्षल चळवळीतून बाहेर पडून सामान्य जीवन जगण्यासाठी गडचिरोलीतील बारा जणांनी तेथील पोलीस विभागाच्या सहकार्याने प्रशिक्षण घेऊन अहिंसा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या आश्रमाला शुक्रवारी भेट दिली. बापूंना अभिवादन करीत त्यांचे रचनात्मक कार्य, स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास जाणून घेतला.
गडचिरोली जिल्ह्यातील काही युवक युवतींनी नक्षल चळवळीने प्रभावित होऊन क्रांतिकारी विचार अंमलात आणण्यासाठी हातात बंदूक घेतली. मात्र, चळवळीत प्रत्यक्ष काम करीत असताना आपण भटकलो आहोत, याची त्यांना वेळीच जाणीव झाली आणि समर्पण केले. यातील कुणी पाच तर कुणी वीस वर्षे नक्षल चळवळीत काढलीत. गेल्या पाच ते एक वर्षात समर्पण केलेल्यांना वर्ध्यातील महात्मा गांधी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात तीन दिवस फिनाईल तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. यातून त्यांना जीवनावश्यक गरजा पूर्ण करता येईल.
गडचिरोलीत पोलिसांच्या सहकार्याने शासनाच्या विविध योजनांचा लाभ या समर्पण केलेल्या व्यक्तींना मिळाला आहे. यातून त्यांचे पुनर्वसन झाले आहे. आज सामान्य नागरिकांसारखे जीवन जगत ते कुटुंबीयांसोबत गुण्यागोविंदाने राहात आहेत. तीन दिवसांच्या प्रशिक्षणासाठी गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पुढाकार घेतला आहे. अंकित गोयल यांनी वर्ध्यातही पोलीस अधीक्षक म्हणून रचनात्मक कार्य केले. नवजीवन योजनेंतर्गत पांढरकवडा येथील पारधी बेड्यावरील नागरिकांना त्यांनी दैनंदिन गरजेच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले होते, हे विशेष.
आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन
समर्पित नक्षल्यांनी भेट दिली असता, संगीता चव्हाण यांनी आश्रमाविषयी माहिती दिली. आश्रमाचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू, मंत्री मुकुंद मस्के, सेवाग्राम पोलीस ठाण्याचे निरीक्षक कांचन पांडे, अयुब खान आणि विमल नयन तिवारी यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले. प्रभू यांनी गांधीजींचा शांती व अहिंसेचा मार्ग दिशा देणारा असून, रचनात्मक कार्यातून आपण खूप काही शिकू शकतो, असे सांगितले. मस्के यांनी बरे-वाईट अनुभव खूप काही शिकवून जातात. आपण आपला मार्ग सोडता कामा नये, ही एक संधी मिळाली आहे. यातून जीवन घडवा, असा संदेश दिला.