वर्धा : चार महिन्यांपूर्वी माझा मुलगा सूरज मांढरे याचा मृतदेह विहिरीत आढळून आला होता. त्याने आत्महत्या केली, असा अंदाज पोलिसांनी वर्तवून कुठलीही शाहनिशा केली नाही. माझ्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली आहे. त्याच्या डोक्यावर जखमा असल्याचे दिसून आले आहे, त्यामुळे दोषींवर कारवाई करून मला न्याय द्यावा, असा टाहो वडील अरविंद मांढरे यांनी पोलीस महानिरीक्षकांसह पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.
सूरज मांढरे, रा. शेकापूर (बाई) याचा मृतदेह ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास विहिरीत आढळून आला होता. याप्रकरणी वडनेर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदानासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मात्र, पोलिसांनी पंचनामा करतेवेळी सूरजच्या डोक्याला असलेल्या जखमा आणि रक्तस्त्राव होत असलेले डाग याचा पंचनाम्यात साधा उल्लेखही केला नाही. वडनेर येथील वैद्यकीय अधिकार्यानेही तसा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे हा शवविच्छेदनाचा अहवाल बनावट असल्याचा आरोप निवेदनातून केला आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे तक्रार दिली;’पण कुठलीही कारवाई झाले नाही. उलट जिल्हा शल्य चिकित्सकांनी तक्रारीची दखल न घेत तक्रार अर्ज पेडिंग ठेवला. या घटनेला चार महिन उलटले असून, प्रकरण दडपविण्याचा वरिष्ठांचा कट आहे असे ते म्हणाले.