समुद्रपूर : तालुक्यातील महामार्गाने जामकडून नंदोरीकडे जात असलेल्या दुचाकी चालकाने वाहनावरील नियंत्रण सुटले. वाहनावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच वाहन स्लीप झाले. यात जमिनीवर आदळल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवार २३ आगस्टला सायंकाळच्या सुमारात घडली. गजानन वडगू तायवाडे (५०) रा. चिखली, असे मृताचे नाव आहे.
गजानन तायवाडे हे एम.एच. ३२ ए.एफ. ०३७३ क्रमांकाच्या दुचाकीने समुद्रपूरकडून जाम मार्गे चिखली येथे जात होते. भरधाव दुचाकी आरंभा येथील टोल नाका परिसरात आली असता वाहन अचानक स्लीप झाले. अशातच गजानन हे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर कुमरे, पोलीस कर्मचारी नरेंद्र दिघडे, किशोर येळणे, देवेंद्र पुरी, नागेश तिवारी, पंकज वैद्य यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह तांब्यात घेत खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. शिवाय घटनेची माहिती समुद्रपूर पोलिसांना दिली. घटनास्थळी पोहोचलेल्या समुद्रपूर पोलिसांनी पंचनामा अंती मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या अपघाताची नोंद समुद्रपूर पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास सुरू आहे.