हिंगणघाट : वाढदिवसाचा जल्लोष साजरा करण्यासाठी कथित ‘भाई’ने मध्यरात्रीच्या सुमारास चौकात युवकांची गर्दी जमवून चक्क तलवारीने केक कापल्याचा व्हिडीओ हिंगणघाट पोलिसांना प्राप्त झाला होता. त्यानुसार पोलिसांनी कथित ‘भाई’चा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या. ही घटना हिंगणघाट येथील संत गोमाजी वॉर्ड परिसरात मंगळवारी मध्यरात्री १२ ते १ च्या दरम्यान घडली.
प्रतिक हनुमान ठाकरे (१९) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. प्रतिकचा वाढदिवस असल्याने त्याच्या मित्रांनी जल्लोषात तो साजरा केला. मात्र, ‘भाईगिरी’ची क्रेझ युवकांना असल्याने त्यांनी इतरांसारखे आपणही तलवारीने केक कापून जन्मदिवस साजरा करू असे ठरविले. ठरल्याप्रमाणे मोठ्या संख्येने युवक गोमाजी वॉर्डातील चौकात मध्यरात्री एकत्र आले आणि एका टेबलवर सात ते आठ केक ठेवून ते केक धारदार तलवारीने कापले.
काही युवकांनी याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये बनविला. तो व्हिडीओ गुन्हे शोध पथकाचे प्रमुख विवेक बन्सोड यांना प्राप्त झाला. त्यांनी तत्काळ याची दखल घेत ही बाब पोलीस निरीक्षक संपत चव्हाण यांना सांगितली. दरम्यान, व्हिडिओत तलवारीने केक कापून दहशत पसरविणाऱ्या प्रतिकचा शोध घेत त्यास बेड्या ठोकल्या. ही कारवाई विवेक बन्सोड, पंकज घोडे, सुहास चांदोरे, प्रशांत वाटखेडे, उमेश बेले यांनी केली.