दशरथ ढोकपांडे
हिंगणघाट : शहरात पोलिसांवर देशी कट्ट्यातून फायर करणाऱ्या दोन्ही आरोपींना आज पहाटेच्या सुमारास येनोरा गावाजवळील शेतशिवारात मोट्या शिताफीने अटक करून २४ तासात या दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, ता. १२ रात्री पोलीस हवालदार कमलाकर धोटे हे नंदोरी चौकात एका मित्रा सोबत बोलत असतांना एका दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी युवकांनी त्यांना वरोराकडे जाण्याचा मार्ग विचारला मार्ग सांगितल्या नंतर धोटे यांना त्यांचा संशय आल्याने त्यांनी अधिक विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने कमरेचा देशी कट्टा काढून आकाशाच्या दिशेने फायर केले असता फायर झाले नाही आणि देशी कट्ट्यातील बुलेट खाली पडली व आरोपी वरोराच्या दिशेने पळून गेले.
या गुन्ह्याचा तपासार्थ पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड हे आपल्या पथकासह शोध मोहीम राबवित असतांना येनोरा शिवारात या गुन्ह्यात वर्णन केल्या प्रमाणे आरोपी दिसल्याने या पथकाने या आरोपींचा पाठलाग सुरू केला असता या आरोपीने पोलीस पथकाच्या दिशेने देशी कट्ट्याने दोन गोळ्या फायर केल्या. परंतु सुदैवाने नेम हुकला याला प्रत्युत्तर म्हणून पो. उपनिरीक्षक लगड यांनी आरोपींच्या दिशेने स्वरक्षणार्थ स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्वर मधून पळून जाणाऱ्या आरोपींच्या पायावर एक गोळी फायर केली.परंतु हे दोन्ही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
प्रकरणाची गंभीरता बघता पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर हे घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने पोलिसांचे वेगवेगळे पथक तयार करून हा संपूर्ण परिसर पिंजून काढला. येनोरा शिवारात हे दोन्ही आरोपी वेगवेगळ्या शेत शिवारात लपून बसलेले असतांना त्यांना ताब्यात घेतले. कोणताही रक्तपात न होता २४ तासाचे आत दोन्ही गंभीर स्वरूपाचे गुन्हे उघडकीस आले.
पोलिसांच्या तपास कार्यात येनोरा गावातील सरपंच, पोलीस पाटील, व गावकऱ्यांनी मोठी मदत केली. सदर गुन्हेगार हे बिहारच्या लकीसरा जिल्ह्यातील असून मागील वर्षांपासून ते मजुरी कामासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीच्या कुंभार मोहल्ला येथे राहत आहेत.यातील एक आरोपी हा अल्पवयीन असून दुसरा जिशान शेख उर्फ जितेंद्र महेश गुप्ता हा २१ वर्षाचा आहे. पोलिसांनी या आरोपीजवळून एक पल्सर दुचाकी,एक मोबाईल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संपत चव्हाण, व उपनिरीक्षक अमोल लगड हे करीत आहेत.