वर्धा : हुतात्मा जंगलू ढोरे व सर्व हुतात्मांच्या च्या शोर्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवा पिढीमध्ये सामाजिक प्रश्नावर स्वतंत्र विचार आणि चीकीत्सक प्रतिक्रीया देण्याची क्षमता निर्माण होईल असे प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य तथा शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ. मंगेश घोगरे यांनी केले.
११ ऑगस्ट १९४२ च्या आंदोलनात ब्रिटीश सरकारच्या गोळीबारात वर्ध्यात प्रथम शहीद झालेले जंगलू ढोरे यांना संवेदना सामाजिक संस्थेतर्फे स्थानिक बजाज फाउंडेशन परिसरात लक्ष्मीनारायण मंदिर बाजूला असलेल्या त्यांच्या स्मारकावर पुष्पचक्र ठेवून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी ते अध्यक्ष स्थानाहून बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी नगरसेवक तथा माजी बांधकाम सभापती निलेश किटे, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे सचिव सतीश जगताप, मुख्याध्यापक संघाचे रामेश्वर लांडे, अजय वानखडे, औंजळ संस्थेच्या अध्यक्ष प्राजक्ता मुते, मुकुल भेंडे, नितीन पठाडे, प्रवीण हिवंज, लक्ष्मीनारायण मंदिराचे ट्रस्टी अंबिका प्रसाद तिवारी, संवेदना सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मनिष जगताप यांची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना मंगेश घोगरे यांनी संवेदना संस्थेने पुढाकार घेत ११ वर्षापासून हुतात्मा जंगलू ढोरे यांना आदरंजली अर्पण करण्याचा कार्यक्रम व येथे देखभाल दुरुस्ती करून सौन्दर्यीकरण व्हावे यासाठी सातत्याने करीत असलेले प्रयन्त समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले तसेच आगामी काळात हुतात्मा जंगलू ढोरे व वर्धा जिल्ह्यातील इतर सर्व हुतात्म्यांची माहिती विविध उपक्रमातून विद्यार्थ्यानपर्यंत पोहचविण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे विचार व्यक्त केले.
नगरसेवक निलेश किटे यांनी हुतात्मा जंगलू ढोरे स्मारकाच्या देखभाल दुरुस्ती व सौंदर्यीकरणाचा नगर परिषदेच्या स्थायी समितीत लवकरात लवकर ठराव घेऊन ते काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्नरत असेल असा सर्वांना विश्वास दिला. तसेच यावेळी संवेदना सामाजिक संस्थेच्या वतीने आमदार पंकज भोयर यांना निवेदन पाठविण्यात आले. यामध्ये त्यांनी हुतात्मा जंगलू ढोरे स्मृतीस्थळाची उपेक्षा रोखण्याकरिता स्मृतीस्थळ परिसरातील समोरील संरक्षक भिंत, कठडे काढून शहिदांच्या शौर्याचा आदर्श समाजापुढे राहण्यासाठी व नव्या पिढीला माहिती होण्यासाठी दर्शनी भागात स्मारक दिसावे व स्मारकाची देखभाल दुरुस्ती करून सौंदर्यीकरण करण्यात यावे अशी मागणी केली आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिष जगताप यांनी केले, संचालन गुरुदेव सेवा मंडळाचे दीपक डोंगरे तर आभार संवेदना संस्थेचे अक्षय बिजवार यांनी केले. आयोजनात संवेदना संस्थेचे मनिष हाडके, धनंजय मेश्राम, चेतन परळीकर,नितेश वंडले, लक्ष्मी पाल, प्रगती मुते, नितेश निकोडे, श्रद्धा सोयाम, तनया जगताप, ख़ुशी मोहरले, नंदिनी महल्ले, बजाज फाउंडेशन रामदेव मुंगले व इतर सामाजिक संघटनेच्या सदस्यांची उपस्थिती होती.