

वर्धा : शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्नाकृती पुतळ्याला लागूनच असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या जागेवर पेट्रोल पंप उभारला जातो आहे. पोलीस कल्याण निधीमधून या पेट्रोल पंप ची उभारणी केली जात आहे. पुतळ्याच्या जवळ पेट्रोल पंप होत असल्याने विविध संघटनाचा याला विरोध आहे. भूमी पूजनानंतर हा विरोध वाढला असून मंगळवारी आंबेडकर चौकात विविध संघटनांच्या वतीने धरणे आंदोलन करून विरोध दर्शविण्यात आला.
या परिसरात पेट्रोल पंप उभा करु नये असे पत्र विविध संघटनांच्या वतीने स्थानिक प्रशासनाला देण्यात आले होते. त्या दृष्टीने प्रशासन प्रयत्न करित असतांनाच पेट्रोल पंपचे भूमिपूजन करण्यात आले. याचा निषेध करित आंबेडकरी पक्ष, सामजिक संघटना व पुरोगामी चळवळीतील संघटनांनी नोंदविण्यासाठी मंगळवारी धरणे आंदोलन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सनदशीर मार्गाने अंदोलन करण्याचा निर्णय पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या वतीने करण्यात आला होता.
पोलीस प्रशासनाच्या कल्याण निधीमधून होणाऱ्या पेट्रोल पंप ला कृती समितीचा विरोध नसून तो ज्या जागेवर होत आहे. त्या जागेपासून पुतळा अगदी जवळ आहे. आणि या परिसरात नेहमी लोक एकत्र येऊन विविध कार्यक्रम करीत असतात. मोक्क्याच्या ठिकाणी असलेली ही जागा नेहमीच वर्दळीची राहिली आहे. प्रशासनाने हा निर्णय मागे घ्यावा यासाठी यापूर्वी विनंत्या करण्यात आल्या होत्या. जिल्हा प्रशासनासोबत चर्चा देखील करण्यात आली होती. परंतु काही दिवसांपूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन पेट्रोल पपंच्या कामाला सुरुवात झाली आहे. त्याचा विरोध करण्यासाठी कृती समितीने विविध संघटनांना एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार विविध संघटना एकत्र आल्या. घोषणा देत निदर्शने करण्यात आली.
जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील विविध भागातून छोटे छोटे मोर्चे घेऊन मोठ्या प्रमाणात पेट्रोल पंप हटाव कृती समितीच्या धरणे आंदोलन ठिकाणी नागरिक एकत्रित झाले. प्रशासनासोबत चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या यात मोर्चेकरयांना पेट्रोल पंप होणार नाही असं आश्वासन देण्यात आलं होतं असे आंदोलकर्त्यांनी सांगितले. धरणे आंदोलन स्थळावर कुठलीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच अग्निशामन दलाच्या गाड्या ही तिथे ठेवण्यात आल्या होत्या.
प्रतिक्रिया…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून हाकेच्या अंतरावर जिल्हाधिकारी कार्यालया आहे. जिल्ह्यातील निवडणुकीचे असो की आंदोलनाचे मोर्चे याच पुतळ्याजवळ येऊन थांबतात. पुढे फक्त निवेदन देणारे पाच लोक पाठविल्या जातात.त्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच जयंती पुण्यतिथीला मेणबत्ती जाळून अभिवादन केल्या जाते त्यामुळे पेट्रोल पंप ला धोका होऊ शकतो पोलीस प्रशासनाकडे इतरही जागा आहेत तिकडे त्यांनी हा पेट्रोल पंप बनवावा जेणेकरून सुरक्षेच्या दृष्टीने योग्य राहील नामांतरास सारखा तीव्र मोठा लढा आम्हाला देण्याची वेळ आली आहे.
शारदा झाम्बरे, सामाजिक कार्यकर्त्या