अपहरणानंतर हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावणारे एलसीबीच्या गळाला! स्टेशन फैलातून घेतले ताब्यात; भंडारा पोलिसांच्या केले स्वाधीन

वर्धा : अपहरण करून हत्या करीत मृतदेहाची विल्हेवाट लावणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने स्टेशन फैल भागातून ताब्यात घेतले. हे दोन्ही आरोपी जुन्हेगारी प्रवृत्तीचे असून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी भंडारा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. कमल रामदास काळे (२६) रा. इंदिरानगर जरीपटका नागपूर व शुभम उर्फ चिनी राजेश भगत (२५)रा. ओमनगर नारा रोड जरीपटका नागपूर अशी आरोपींची नावे आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेची चमू गस्तीवर असताना काही तरुण स्टेशन फैल परिसरात संशयास्पद हालचाली करीत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेत विचारणा केली असता आपण नागपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच त्यांना नागपूर येथून दोन वर्षांकरिता हद्दपार असल्याचे आणि त्यांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने २ ऑगस्टला पोलीस स्टेशन गोबरवाही जि. भंडारा हद्दीत मृतक नंदकिशोर माने याचे अपहरण करून नंदकिशोर याला ठार केले. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता मृतदेह पेटवून नाल्यात फेकल्याची कबुली पोलिसांना दिली. तसेच त्यांनी सावनेर रोड, नागपूर येथून दुचाकी चोरल्याचेही पोलिसांना सांगितले. त्यानंतर वर्धा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भंडारा पोलिसांशी संपर्क साधून अधिकची माहिती घेत पुढील कार्यवाहीसाठी या दोघांनाही भंडारा जिल्ह्यातील गोबरवाही पोलिसांच्या स्वाधीन केले.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशानुसार स.पो.नि. महेंद्र इंगळे, संतोष दरमुडे, स्वप्नील भारव्दाज, चंद्रकांत बुरंगे, राजेश तिवस्कर, संघसेन कांबळे, राकेश आष्टणकर, विकास अवचट, रितेश शर्मा, श्रीकांत खडसे, प्रदीप वाघ यांनी केली. आरोपींना मोठ्या हूशारीने ताब्यात घेतल्याने पोलिसांच्या चमूचे कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here