वर्धा : वेतनवाढीच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण कर्मचारी संघटना (एमसॅक)च्या नेतृत्त्वात आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी शुक्रवारपासून असहकार आंदोलन सुरू केले आहे.
शुक्रवारी आंदोलनकर्त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारात घोषणाबाजी देत विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सकांना सादर केले. एड्स नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यात काही अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे; परंतु याच अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सध्या नाममात्र वेतन दिले जात आहे.
वेतनवाढ करण्यात यावी, अशी मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शुक्रवारपासून वेतनवाढीच्या मुद्द्याकडे जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू करण्यात आले आहे. येत्या काही दिवसांत मागण्यांवर विचार न झाल्यास २ ऑगस्टपासून अहवाल पाठविणे बंद करीत १ सप्टेंबरला राज्यभर महाआंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.