सायली आदमने
वर्धा : जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांनी मोठी रुग्णालये भरगच्च आहेत. विशेषतः लहान मुलांमध्ये डेंग्यूचा प्रकोप सर्वात जास्त असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी डेंगू सारख्या आजारासाठी पावसाळ्यापूर्वी करावयाचे प्रतिबंधात्मक उपाय केले गेले नाही. शेकडो रुग्ण विविध रुग्णालयात असताना शासकीय आकडेवारी मात्र कमीच दिसून येत आहे. डेंग्यूचा डंख वाढल्यामुळे मात्र खाजगी रक्त तपासणी लॅब मधील तपासण्याचे दर वाढले आहेत.
वर्धा जिल्हा हिवताप विभागाने दिलेल्या आकडेवारी नुसार जानेवारीपासून आतापर्यत डेंग्यूचे केवळ 120 रुग्ण आहेत. तर 447 संशयित रुग्ण आहेत. वास्तविकता पाहिली तर मात्र आकडेवारीची परिस्थिती विपरीत पाहायला मिळते. सावंगी, सेवाग्राम आणि सामान्य रुग्णालयात डेंग्यूचे रुग्ण वाढले. डेंग्यूच्या रुग्णांची संख्या मोठी असताना मात्र हिवताप विभागाची आकडेवारी शंका निर्माण करणारी आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यात सध्या डेंग्यूचा रुग्ण आहे. विविध खाजगी लॅबमध्ये तपासण्यात येणाऱ्या रुग्णांना संशयित म्हणून शासकीय कागदावर नोंद केली जाते. याचे नेमके कारण काय? तर या लॅबवर आरोग्य विभागाचा विश्वास नाही. अधिकृत म्हणजेच ठरलेल्या लॅबमधूनच रक्त तपासणी केल्यावर रुग्ण ठरतो. असे असेल तर मग अशा खाजगी लॅब कडून अव्वाच्या सव्वा शुल्क आकारून केलेल्या तपासण्या अधिकृत आहेत की नाही असाही प्रश्न आता उपस्थित होत आहे.
पवनूर व कन्नमवार ग्राममध्ये रुग्णसंख्या
आंजी नजीकच्या पवणूर येथे डेंगूचे अनेक रुग्ण आढळून आले आहे. ग्राम पंचायतने स्वच्छतेसाठी नेमके काय केले याचे परीक्षण करण्याची वेळ गावावर आली आहे. तर कारंजा तालुक्यात येणाऱ्या कन्नमवार गावात तर अस्वच्छतेने कळसच रचला आहे. ठिकठिकाणी नाल्यांची दैना झाली आहे. तर गावात असणारे कचऱ्याचे ढिगारे विविध आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. येथे रुग्णसंख्या सतत वाढत असताना फवारणी करण्याची मागणी सतत वाढत आहे. विशेष म्हणजे कन्नमवार ग्राम हा जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे यांचा मतदार संघ आहे. आणि याच भागात स्वच्छतेचे तीन तेरा वाजावे ही शोकांतीका म्हणावी लागेल.