

आकोली : न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तसेच वाद दाखलपूर्व प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जाते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील राष्ट्रीव लोक अदालतीमध्ये ९३७ प्रकरणाचा निपटारा करण्यात आला असून ५ कोटी ९८ लाख ८६ हजारांची प्रकरणे निकाली निघाली. त्यामुळे दोन्ही पक्षकारांना मोठा दिलासा मिळाला.
वर्धा जिल्हा न्यायालयामध्ये राष्ट्रीय लोक अदालत पार पडली. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये दोन्ही पक्षकारांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळते. तसेच दोन्ही पक्षकारांच्या आपसी सहमतीने प्रकरणांमध्ये तडजोड होत असल्याने निकालाचे समाधान दोन्ही पक्षकारांना असते. यामुळे पक्षकारांचा वेळ व पैश्यांची बचत होऊन मनासारखा समझोता झाल्याने मानसिक समाधान लोक अदालतमुळे पक्षकारांना मिळते, असे मत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष एएन. करमरकर यांनी राष्ट्रीय लोक अदालतप्रसंगी व्यक्त केले.
तसेच राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठ्या प्रमाणात प्रकरणे आपसी तडजोडीने निकाली काढण्याचे आवाहन, उपस्थित पक्षकार आणि अधिवक्ता यांना केले. राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायाधीश, अधिवक्ता मंडळी तसेच पक्षकार उपस्थित होते. या लोक अदालतीमुळे पक्षकारांनाही मोठा आधार मिळत असल्याचे सांगितले जात आहे.