वर्धा : भरधाव असलेल्या दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीवरील एक जागीच ठार झाला. तर दुसरा गंभीर जखमी आहे. हा अपघात धोत्रा शिवारात सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला.
सालोड येथून पुलगावकडे जाणाऱ्या मार्गाचे डांबरीकरण करण्यात आल्याने या मार्गावरून सुसाट वाहने दामटविली जात आहे. यामुळेच या मार्गार अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारीसुध्दा या मार्गावर एक दुचाकी अपघातग्रस्त स्थितीत पडून होती. तर चालकांचा जागेवरच मृत्यू होवून त्याचा सहकारी जखमी अवस्थेत मदत मागत होता.
या रस्त्यावरून आवागमण करणाऱ्यांनी जखमीला रुग्णालयात पाठवून या अपघाताची पोलिसांना माहिती दिली. सालोड ते. दहेगाव मार्गादरम्यान धोत्रा शिवारात हा अपघात झाला असून मृताचे व जखमीचे नाव मिळू शकले नाही. यांच्या दुचाकीचा अपघात कसा घडला याचीही माहिती मिळाली नाही. पुढील तपास पोलीस करीत असल्याचे सांगण्यात आले.