वर्धा : गांधी विचारांचा प्रचार व प्रसार करण्याचे काम सर्व सेवा संघाच्या माध्यमातून केले जाते. सर्व सेवा संघाचे राष्ट्रीय कार्यालय सेवाग्राम येथील महादेव भवन येथे असून याच कार्यालयात बळजबरी घुसून कार्यालयीन कर्मचाऱ्यांना धमकावल्याने सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष महादेव विद्रोही यांच्याविरुद्ध सेवाग्राम पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४४८ व ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सर्व सेवा संघाचे महामंत्री गौरांगचंद पंचानन महामात्रा यांनी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीस सूत्रानुसार, सर्व सेवा संघाचे माजी अध्यक्ष महादेव रामनारायण विद्रोही यांनी सेवाग्राम येथील सर्व सेवा संघाच्या राष्ट्रीय कार्यालयात बळजबरी प्रवेश केला. इतकेच नव्हे तर त्यांनी आपणच अजूनही सर्व सेवा संघाचे अध्यक्ष असल्याचे म्हणत ते थेट सर्व सेवा संघाच्या अध्यक्षाच्या खुर्चीवर बसले. त्यांनी कार्यालयातील कर्मचारी सचिन नवघरे, जीवन शेंडे, मनिष मगर यांना धमकावत अध्यक्षाच्या खुर्चीवर बसून स्वत:चे छायाचित्र काढले.
ही बाब कार्यालय प्रपुख अविनाश काकडे यांना सांगण्यात आली. त्यांनी ही माहिती गौरांगचंद महापात्रा यांना दिली. उडीसा येथून सेवाग्राम येथे परतल्यावर गौरांगचंद महापात्रा यांनी याप्रकरणी सेवाग्राम पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तक्रारीवरून महादेव विद्रोही यांच्याविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.