देवळी : पावसाळा सुरू होताच जनावरांना घटसर्प, एकटांग्या व तोंडखुरीचे आजार बळावत आहेत. यामुळे जनावरांना निरोगी ठेवण्याकरिता तात्काळ लसीकरण करणे गरजेचे आहे. परंतु ग्रामीण भागातील पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी संप पुकारल्याने पशुधन धोक्यात आले आहे. शेतकरी आणि पशुपालक लसीकरणाकरिता चिकित्सालयात धाव घेत असून, लसीकरण होत नसल्याने पशुधनाची चिंता वाढली आहे.
पशुधन पर्यवेक्षक व सहायक पशुधन विकास अधिकारी यांनी सर्वत्र संप पुकारला असून, या संपादरम्यान वरिष्ठ पशुधन अधिकारी व संबंधित कर्मचारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. खासगी पशुचिकित्सकांवर या कर्मचाऱ्यांकडून ग्रामीण भागात सेवा न देण्याकरिता दबाव आणला जात असल्याचा आरोपही होत आहे. पशुधन पर्यवेक्षकांना वरिष्ठ पशुधन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात उपचार करावयाचे आहेत.
परंतु या कर्मचाऱ्यांची वैयक्तिक उपचार करण्यासह ग्रामसेवक व कृषी सहायक यांच्याप्रमाणे कायम प्रवास भत्ता, विमा सुरक्षा कवच, कालबद्ध पदोन्नतीच्या वेतन निश्चितीत सुधारणा तसेच पशुधन पर्यवेक्षक ते सहायक पशुधन विकास अधिकारी पदोत्री आदी मगण्यांकरिता १५ जूनपासून आंदोलन सुरू केले आहे. तेव्हापासून वरिष्ठांना कामाबद्दलचा अहवाल देणे बंद केले आहे.
या संपामुळे ग्रामीण भागातील पशुचिकित्सालयात पाठविण्यात आलेल्या घटसर्प व एकटांग्या आजाराच्या लसी पडून आहेत. दरवर्षी मे महिन्यात शासनाकडून उपलब्ध होणारी तोंडखुरी आजाराची लस अद्यापही पाठविण्यात आली नसल्याने हा आजार बळावत आहे. आता पशुधनाला आजाराने ग्रासले असून, लस उपलब्ध असतानाही ती मिळत नसल्याने शेतकरी व पशुपालक अडचणीत आले आहेत.