वर्धा : वर्धा वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी धडक कामगिरी करून वन्यजीवांची शिकार करणाऱ्या तीन सदस्यीय टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तब्बल अकरा वन्यजीवांसह दुचाकी व इतर साहित्य, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अजय महेबूब काळे (२७), निळकंठ पंजाब पवार (२८) दोन्ही रा. गोपालनगर, ता. राळेगाव, जि. यवतमाळ तसेच अनिल गुलाब पवार रा. उंबरविहीर, ता. राळेगाव, जि. यवतमाळ, असे अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात आले.
वन्यजीवांची शिकार करणारी यवतमाळ जिल्ह्यातील टोळी वर्धा-चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात येऊन शिकार करीत असल्याची माहिती पोहणा वनक्षेत्राचे वनरक्षक मनेशकुमार सज्जन यांना मिळाली. त्यानंतर वनरक्षक सज्जन यांनी सापळा रचून दुचाकीने येत असलेल्या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील साहित्याची पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात वन्यजीव आढळून आलेत.
आरोपींकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी नऊ जिवंत ससे, एक तितर, एक लाव्हा, एमएच १४ ईटी ०३७८ क्रमांकाची दुचाकी, दोन मोबाइल, बॅटरी व टॉर्च, वन्यप्राणी पकडण्यासाठी वापरण्यात येणारे जाळे व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. या तिन्ही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम ९, ३९(२), ५२, ४८(अ), २(३६),५९(१)(क), ६० अन्वये गुन्ह्याची नोंद घेत त्यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई उपवनसंरक्षक राकेश शेपट, सहायक वनरक्षक भीमसिंग ठाकूर यांच्या मार्गदर्शनात वर्धा वनपरिक्षेत्र अधिकारी रूपेश खेडकर यांच्या निर्देशावरून वनपाल सचिन कापकर, वनरक्षक मनेशकुमार सज्जन, यू. एल. पवार, अमोल पिसे, संजय गायकवाड, अशपाक पठाण यांनी केली.