

वर्धा : जिल्ह्यातील महसूल कोतवालांना शिपार्ई संवर्गात पदोन्नती द्यावी, या मागणीसाठी कोतवालांनी कामबंद आंदोलनाचा बडगा उगारला असून, कोतवाल संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाला सुरुवात केली.
जिल्ह्यात कोतवालांची शिपाई संवर्गातील पदोन्नती अद्याप झाली नाही, याबाबत अनेकदा निवेदने देऊनही कोतवालांना न्याय मिळाला नाही. मागील २१ वर्षांपासून कोतवालांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. कोतवालांच्या हक्काच्या जागेवर सरळ सेवेने भरती घेतली; परंतु पदोन्नतीपासून दूरच ठेवल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला, राज्यातील सर्वच जिल्ह्यात नियमित पदोन्नती होत आहे.
मात्र, जिल्ह्याती कोतवालांवर अन्याय का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कोतवालांना पदोन्नती द्यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य महसूल कोतवाल संघटनेच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलनात कोतवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश कोहपरे, जिल्हा संघटक स्वराज जिलठे, उपाध्यक्ष उमेश वैद्य आदींसह सदस्य उपस्थित होते.