आर्वी : जीवन प्राधीकरणाच्या दुर्लक्षामुळे हजारो लीटर पाण्याचा अपव्यय होत असून याकडे लक्ष देण्याची मागणी सुरेश मोटवाणी यांनी केली आहे. आर्वी ते वर्धा मार्गावर असलेल्या पेट्रोलपंपाजवळ मागील सात दिवसांपासून पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली असल्याने हजारो लीटर पाणी वाया जात आहे. नागरिकांनी याबाबत जीवन प्राधीकरण कार्यालयात तक्रार केली. मात्र, तिथे एकच लिपिक असल्याने तक्रार कोणाकडे करावी ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वर्धा येथील अभियंता डहाके यांच्याकडे आवींचा भारे सोपविल्यामुळे ते उपस्थित राहत नाहीत. आठवड्यातून एक दिवस आर्वीला येतात. त्यामुळे तक्रार कुठे करावी, हा प्रश्न नागरिकांसमोर आहे. पाणीपुरवठा योजना आणि मेंटेनन्सचे कंत्राट अमरावती जिल्ह्यातील कंत्राटदाराला दिले असल्याची माहिती आहे. मात्र हे कंत्राटदार येथे राहत नसल्याने पाण्याची मोठी अडचण निर्माण झाली आहे.