

वर्धा : कोरोनाकाळामुळे व्यवसाय ठप्प झाल्याने अर्थचक्रच गडगडले. त्यामुळे कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने कुटुंबाला सावरायचे कसे? या आर्थिक विवंचनेतून शेतकरी महिलेने भाड्याच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी पहाटे चार वाजल्यादरम्यान नजीकच्या पिपरी (मेघे) येथे उघडकीस आली.
सुलोचना होरेश्वर कोरडे (वय 3८) रा. किन्हाळा (बोथळी) असे मृत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती शेतीसोबत जोडव्यवसाय म्हणून स्कूलबस चालवायचे. सुलोचना यांनीही पतीला हातभार लागावा म्हणून दूध डेअरीचा व्यवसाय सुरू केला होता. दोन मुली शिक्षणाच्या असल्याने त्यांनी पिपरी (मेघे) येथील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये भाड्याने राहत होत्या. गेल्या वर्षी शेतात नापिकी झाली. कोविडमुळे पतीचा स्कूलबसचा व्यवसाय बंद पडला आणि मुलींच्या लाकडाऊनमुळे डेअरी व्यवसायही ठप्प झाला.
त्यामुळे शेतीकरिता बँकेकडून घेतले कर्ज थकीत राहिले. मुलींच्या शिक्षणाकरिता आणि परिवाराचा गाडा चालविण्याकरिताही उसणवारी किंवा नातलगांकडून पैशाची जुळवाजुळव केल्याने कर्जाचा डोंगर वाढतच गेला. यातूनच कोरडे परिवार आर्थिक अडचणीत सापडल्याने बाहेर पडण्याचे कोणतीही शक्यता न दिसल्याने विवंचनेत असलेल्या सुलोचना यांनी भाड्याच्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी त्यांच्या भावांनी रामनगर पोलिसांत तक्रार दिली असून, पोलीस पुढील तपास करीत आहेत.