आर्वी : रिझर्व्ह बँकेच्या नियमांत कोणताही नवीन बदला झाला की राष्ट्रीयीकृत बँकेच्या नियमांत वेळोवेळी बदल होतात. काही बदल सकारात्मक तर काही नकारात्मक असतात. त्यामुळे ठेवीदारांना विनाकारण भुर्दंड व मानसिक त्रास सहन करावा लागतो आहे. आजवर मुदतठेवीचे मुदतपूर्तीनंतर त्या रकमेचे आपोआपच नूतनीकरण (ऑटो रिन्युअल) होत होते. त्यामुळे बँकेच्या ठेवीदारांना नवीन नूतनीकरणासाठी बॅंकेकडे धाव घ्यावी लागत नव्हती.
ज्येष्ठ नागरिकांसाठी ही आधीची पद्धत सोयीची व मोठा मानसिक दिलासा देणारी होती. परंतु, आता मात्र आरबीआयच्या नव्या क्लिष्ट नियमांनुसार प्रत्येक मुदतीनंतर आपण ठेवीचे नूतनीकरण न केल्यास, ठेवीदारांना फक्त बचतखात्यावरील व्याज मिळेल, थोडक्यात आता जुनी ऑटो रिन्युअल पद्धत बंद होणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांची परवड होणार आहे.
अर्थात वर्ष, सहा महिने, ४५ दिवस अशा पद्धतीच्या मुदत ठेवी असणाऱ्या बँकेच्या ठेवीदारांना नूतनीकरणासाठी प्रत्येक वेळी बँकेत वारंवार खेटे घालावे लागणार असल्याने ज्येष्ठ नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. ज्येष्ठ नागरिक विशेषतः ग्रामीण भागातील सेवानिवृत्त नागरिकांना हा नियम अत्यंत त्रासदायक ठरणार आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट झाला आहे. त्यातच नव्या नियमांमुळे ज्येष्ठांना पैशासाठी नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे याकडेही तत्कळ बँक व्यवस्थापकाने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.