पवनार : येथील वॉर्ड क्रमांक एकमध्ये डेग्यूचे दोन रुग्ण आढळून आल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अथांग अनिल नगराळे (७) व पायल शंकर राऊत (१६) या दोघांनाही ताप आल्याने त्यांची तपासणी केली असता डेंग्यूच्या आजाराचे निदान झाले.
दोघांचीही प्रकृती चांगली असल्याचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अक्षय इंगळे यांनी सांगितले. गावात डेंग्यूचे रुग्ण वाढू नयेत याकरिता डॉ. अक्षय इंगळे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य सेवक आनंद पिल्लरे, आरोग्य सेविका संगिता वाटमोडे, आशा स्वयंसेविका गावामध्ये फिरुन सर्व्हक्षण करीत आहे. सर्व वॉर्डात ग्रामपंचावतच्या वतीने फवारणी करण्यात आली असून नाली स्वच्छता व कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आले. नागरिकांनीही आपल्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवावा. कुलरचा टप, पाण्याचे टाके साफ करुन त्याला कोरडे करावे तसेच नागरिकांनी आठवड्यातील एक दिवस कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले.