मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याप्रकरणी अडचणीत सापडलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळं आज होणारी त्यांची पत्रकार परिषद रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसनं दिली आहे. तसंच, ते आज चौकशीसाठी हजर राहणार का?, असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. त्यानंतर एकनाथ खडसेंनादेखील समन्स बजावण्यात आला आहे. बुधवारी सायंकाळी खडसे यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी समन्स बजावला. गुरुवारी सकाळी ११ वाजता दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पीयर येथील कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहावे, असे ‘ईडी’ने म्हटले आहे. ईडी कार्यालयात चौकशीसाठी जाण्याआधी खडसे पत्रकार परिषद घेणार होते. या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार, कोणता मोठा गौप्यस्फोट करणार याकडे सगळ्याचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळं आज होणारी पत्रकार परिषद रद्द करावी लागली आहे.
ईडीने आज आज एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अचानक प्रकृती खालावल्यानं खडसे चौकशीसाठी हजर राहणार का?, की ईडीकडे चौकशीसाठी वेळ वाढवून मागणार? अशा चर्चांना उधाण आलं आहे. ज्या प्रकारे अनिल देशमुख यांनी ईडीकडून काही कागदपत्र मागवून ईडीकडून वेळ मागून घेतली होती, त्याच धर्तीवर एकनाथ खडसे हे देखील ईडीकडे वेळ मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, पुण्याजवळील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या भूखंडाची खडसे यांनी २०१६मध्ये गिरीश चौधरी यांच्या नावे फक्त ३.७५ कोटी रुपयांची खरेदी केली होती. प्रत्यक्षात त्या भूखंडाची किंमत ३१ कोटी रुपये होती. एकंदर गैरव्यवहार बघता या सर्व व्यवहारात सुमारे ६१ कोटी रुपयांच्या महसुलाचे नुकसान झाल्याचे सकृत दर्शनी दिसून येत आहे. हा मोठा गैरव्यवहार असल्याचा ‘ईडी’ला संशय आहे.