मुंबई : राज्याच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात भाजपानं घातलेल्या गोंधळाचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करताना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. “राज्याची मान शरमेनं खाली जाईल असं वर्तन भाजपसारख्या जबाबदार पक्षानं सभागृहात केलं. भास्कर जाधव यांनी संपूर्ण प्रकरणाची बहुतेक माहिती दिली. पण सविस्तर माहिती दिली नाही. जे घडलं ते अतिशय निंदनीय होतं. त्यात विषय फक्त केंद्राकडे माहिती मागण्याचा ठराव होता. मग इतकी आगडोंब करण्याची मूळात गरजचं काय होती?”, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला.
“आम्ही काही त्यांना टोचलं नव्हतं. चर्चा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन केंद्राकडे इम्पेरिकल डेटाची मागणी करण्याचा होता. त्यासाठी इतका आरडाओरडा करायचा आणि माईक असूनही बेंबीच्या देठापासून ओरडायचं ही काही आरोग्यदायी लोकशाहीची लक्षणं नाहीत. अधिवेशनातील वागणुकीचा उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावत चाललाय ही महाराष्ट्राची संस्कृती नाही”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेेद्र फडणवीस यांना टोला लगावला.
…मग केंद्र सरकार घोटाळा करतंय का?
“ओबीसींच्या आरक्षणासाठी लागणारा डेटा केंद्राकडे आहे. पंतप्रधानांची भेट घेतली त्यावेळी केलेल्या मागण्यांमध्ये एक मागणी इम्पेरिकल डेटा राज्य सरकारला द्यावा या संदर्भात देखील होती. त्यानंतर राज्यपालांची भेट घेऊनही तिच मागणी आम्ही पत्राद्वारे केली. राज्य सरकारकडे कोणतीही माहिती नाही. पण केंद्राकडचा इम्पेरिकल डेटा निरुपयोगी ठरणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यात ८ कोटी चुका असल्याचं विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं. मग त्यांना ही माहिती कुणी दिली? राज्य सरकारला डेटा मिळत नाही. त्याबद्दल कोणतीही माहिती सरकारकडे नाही. मग त्या डेटामध्ये ८ कोटी चुका असल्याची माहिती विरोधी पक्षनेत्यांच्या कानात कुणी येऊन सांगितली?”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.
यासोबतच केंद्राकडे असलेल्या डेटामध्ये ८ कोटी चुका असतील असं जर विरोधी पक्षनेत्यांचं म्हणणं असेल तर तो डेटा पंतप्रधान योजनांसाठी वापरला जातो, मग केंद्र सरकार घोटाळा करतंय का? असं आपण म्हणायचं का? केंद्र सरकार चुकीचा डेटा वापरुन योजना राबवतंय असा याचा अर्थ होत नाही का?, असे प्रश्न उद्धव ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केले.