वर्धा : सेलू तालुक्यातील हमदापूर ते देऊळगाव मार्गाचे काम सुरु असताना देऊळगावजवळ मजुरांना आगळावेगळा साप दिसताच एकच धावपळ उडाली. त्या सापाची पाहणी केल्यानंतर तो अतिदुर्मिळ काळडोक्या साप असल्याचे स्पष्ट झाले. वर्धा जिल्ह्यात गेल्या नऊ वर्षांत ही दुसरी नोंद असल्याचे सांगितले जात आहे.
कामावरील मजुरांनी त्या सापाची माहिती देऊळगाव येथील रहिवासी आकाश पिसे यांना दिली. त्यांनी त्या सापाचे छायाचित्र वर्ध्याचे प्राणिमित्र शुभम जळगावकर यांना व्हाॅट्सअॅपवर पाठविले. त्यांनी लगेच हा साप अतिदुर्मिळ बिनविषारी काळडोक्या साप असल्याच सांगितले. हा साप विषारी पोवळा या सापासारखा दिसतो.
या सापाचे शरीर तपकिरी रंगाचे असून शरीरावर तोंडापासून शेपटीपर्यंत शरीराच्या पृष्ठभागावर मध्यभागी लहान काळे ठिपके असतात. तसेच दोन्ही बाजूला तोंडापासून शेपटीपर्यंत लहान छिद्र असतात. या सापाला कृषशीर्ष असेही म्हटले जाते. याची लांबी एक ते दोन फुटापर्यंत राहत असून त्याचे प्रमुख खाद्य सरडे, सापसुळी व त्यांची अंडी असते. कोणताही वन्यजीव दिसल्यास त्याला त्रास न देता वनविभाग किंवा प्राणीमित्रांना संपर्क करावा, असे आवाहन शुभम जळगावकर यांनी केले.