वर्धा : प्रेमाला विरोध… घरच्यांशी बंड… तर आर्थिक परिस्थितीतून अनेकदा मुले आई- वडिलांची पर्वा न करता घरातून पलायन करतात. मात्र, त्यांचे पुढे होते काय, हे कुणालाही ठाऊक नाही. अशा घटना जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याची पायरी चढतात. २०१८ ते २०२१ मे पर्यंत एकूण ६८ अल्पवयीन मुलांनी घरातून पलायन केल्याची नोंद पोलीस दप्तरी करण्यात आली आहे. पोलिसांनी ६६ मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले असून, २ मुलांचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याची माहिती आहे.
फिल्मी स्वप्नरंजन, घरातून पळण्याचा थरार, घरच्यांच्या विरोधात बंड, सिनेमात काम करण्याची हौस, स्वतंत्र जगण्याची इच्छा यासह प्रेमात पडून ‘साथ जीने की कसमे’ खाण्याचे इरादे या साऱ्या कारणांसह अल्पवयीन मुले घरातून पलायन करीत असल्याचे पुढे आले आहे. मात्र, फिल्मी संघर्षाच्या पलीकडे जाऊन जेव्हा वास्तवाचे अंगारे त्यांच्या वाट्याला येतात तेव्हा ते चटके बसल्यानंतर त्यांना घराची आठवण येते. अल्पवयीन मुलांचे घरातून पळण्याचे प्रमाण वाढत आहे.
मनात, शरीरात जे बदल घडत असतात, त्याची माहिती तर अपुरी असतेच; पण नेमक्या त्याच काळातील अपुऱ्या आधारामुळे अनेक जण प्रचंड संभ्रमावस्थेत असतात. प्रेम प्रकरणे, शारीरिक आकर्षण, त्यात फसणे, त्यातून निर्माण होणारे ब्लॅकमेलिंगसारखे प्रश्न, शारीरिक बदलांमुळे घाबरून जाणे, बोलायला कुणीच नसणे, कुणी समजून घेत नाही, असे वाटणे, हा सारा समाज माझ्या विरुद्ध आहे, असे वाटणे आदी अनेक कारणांतून नैराश्यात सापडलेली मुले घरातून पलायन करण्यासारखे टोकाचे पाऊल घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.
१९ पोलीस ठाण्यांत दर दिवसाआड एक ना एक मुलगा घरातून पळून गेल्याच्या नोंदी केल्या जात आहेत. मात्र, पोलिसांकडून योग्य ती दखल घेत त्यांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केल्या जात आहे. तीन वर्षांच्या कालावधीत तब्बल ६६ अल्पवयीन मुलांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलीस अधीक्षक प्रश्नांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनामुळेच हे यश प्राप्त झाले.