वर्धा : गावातील युवकावर कोयत्याने हल्ला चढवून जिवानीशी ठार मारण्याच्या प्रयत्नात गुन्हेगार असलेला आरोपी गेल्या तीन वर्षांपासून फरार होता. त्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्याच्या खैरी (पन्नासे) या गावातून अटक केली.
दीपक गोमाजी जुगनाके (3२) रा. सुकळी (स्टेशन) असे आरोपीचे नाव आहे. त्याने २० नोव्हेंबर २०१८ रोजी गावातील संतोष दशरथ येळमे (3०) याच्यावर कोयत्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते, याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होता.
सेलू पोलीसांसोबतच स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरु होता. यादरम्यान तीन वर्षांपासून फरार असलेला आरोपी दीपक हा वर्धा जिल्ह्या लगतच्या हिंगणा तालुक्यातील खैरी (पन्नासे) या गावात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच पोलिसांनी त्याला मोठ्या शिताफीने अटक करून सेलू पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रश्नांत होळकर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक नीलेश ब्राह्मणे, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे यांच्या निर्देशानुसार पोलीस उपनिरीक्षक सौरभ घरडे, अशोक साबळे, अनिल कांबळे, अवि बन्सोड व नितीन मसराम यांनी केली.