वर्धा : खंडणीच्या चुकीच्या आरोपावरून अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सध्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची चौकशी करीत आहे. मात्र, हे सर्व आरोप करीत खळबळ उडवून देणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग सुट्टीवर आहेत. अनिल देशमुख यांना नाहक त्रास देण्याचे काम ईडी आणि सीबीआय करीत आहे. तर, सिंग यांना केंद्र सरकारची ‘स्पेशल केस’ समजून ईडी आणि सीबीआय मेहरनजर दाखवित आहे.
ईडी सिंग यांची चौकशी का करीत नाही? असा सवाल उपस्थित केला जात आहे. भाजपसोबत मिळून अनिल देशमुख यांना गोत्यात आणण्याचे काम सिंग यांनी केले आहे, असा आरोप राष्ट्रवादीतून होत आहे. अनिल देशमुख यांना वाट्टेल तेव्हा बोलवायचे आणि सिंग यांना मोकळीक कोणत्या आधारावर देत आहे, ही बाब ईडीने स्पष्ट करावी, अशी मागणी होत आहे. निव्वळ केंद्रातील भाजप सरकार सांगेल तसे डाव खेळायचे हेच ईडीचे काम आहे का ? असा संतप्त सवाल केला जात आहे. आज ईडीला लिहिलेल्या पत्रात अनिल देशमुख यांनी म्हटले आहे की, “मी जवळपास ७२ वर्षांचा आहे. मला विविध प्रकारच्या व्याधी आहेत.
२५ जून रोजी ईडीने तपास करताना आणि जबाब नोंदवताना मी बरेच तास आपल्याशी संवाद साधला. तरीही, त्रास म्हणून हा सर्व प्रकार सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ईडीने देशमुख यांच्याविरोधात खंडणीचे प्रकरण दाखल केले आहे. त्यासंदर्भात अंमलबजावणी माहिती अहवालाची (ईसीआयआर) प्रत ईडीने द्यावी. त्यानंतरच ईडीने मागितलेली सर्व माहिती आणि कागदपत्रे सादर करणार असल्याचे देशमुख म्हणाले. ईडीने आपली बाजू आधी स्पष्ट करावी आणि नंतरच देशमुख यांना बोलवावे, असा दावा राष्ट्रवादीकडून केला जात आहे. कोणत्या प्रकरणात ईडी अनिल देशमुख यांची चौकशी करीत आहे, ही बाब अजूनही स्पष्ट झालेली नाही. त्यामुळे भाजपच्या इशाऱ्यावर ईडी, सीबीआय नाचत आहे.
वाझेला अटक, सिंगला कधी?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात स्फोटकांची गाडी उभी करण्यात आली होती. या प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद होती. त्यानंतर पदावरून हटविण्यात आल्याच्या रागातून भाजपशी हातमिळवणी करून देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने अटक केलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, काझींसह पाचही अधिकारी हे थेट परमबीर सिंग यांना माहिती देत होते. वास्तविक सहआयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त अशी साखळी असते. मग हे अधिकारी थेट परमबीरसिंग यांनाच थेट कसे काय भेटून माहिती देत होते. याबाबतही देशमुख यांनी संशय व्यक्त केला. राज्याच्या गृहरक्षक दलाचा पदभार स्वीकारल्यानंतर 5 मे पासून सिंग त्यांच्या कार्यालयात आले नसल्याची माहिती आहे. माजी गृहमंत्री देशमुख यांच्यावर आरोप करणारे सिंग ऐनवेळी सुट्टीवर कसे गेले ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
परमार,पाटीलच्या मागे भाजप ?
जयश्री पाटील यांच्या पाठोपाठ ऍड.तरुण परमार यांनी देखील ईडीकडे अनिल देशमुख संबंधी पुरावे असल्याचे सांगितले आहे. वास्तवीक या दोघांच्या मागे भारतीय जनता पार्टीचे पाठबळ असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ऍड.पाटील यांनी ऍड.हरिश साळवे सारखा जगविख्यात वकील कसा काय ठेवला या बद्दल आश्चार्य व्यक्त करण्यात येत आहे. ऍड.साळवे हे एका स्र्टँडगचे दहा लाख रुपये घेतात.मग ही रक्कम कोणी मोजली. तर ऍड.परमार एकाकी आताच का बाहेर आले. गेल्या तीन महिन्यांपासून प्रकरण सुरु असताना ते कुठे होते. ते नागपूरचे असून त्यांच्या जवळ ईडीला देण्यालायक खात्रीशीर पुरावे आले कुठून की भाजपाने पुरवले अशी चर्चा देखील शहरात सुरु आहे.
अनिल देशमुख निर्दोष सिद्ध होतील
केंद्र सरकारची यंत्रणेचा गैरफायदा घेऊन अनिल देशमुख यांना बदनाम करण्याचे षडयंत्र भारतीय जनता पार्टीने रचले आहे. आपल्या राजकीय कारर्कीदीत अनिल देशमुख हे स्वच्छ प्रतिमेचे नेते म्हणून ओळखल्या जातात.मात्र गृहमंत्री झाल्यापासून अनिल देशमुख यांनी राज्यात गुंडगिरीवर लगाम लावला आणि तेच जणू भाजपाच्या जिव्हारी लागले. परमबिर्र सिगच्या आड भाजपने हे कटकारस्थान रचले आहे. कोणतेच ठोस पुरावे मिळाले नसतानाही गुन्हा दाखल करणे,सीबीआय,ईडीचे छापे टाकणे हे सर्व जनतेच्या लक्षात आले आहे. अनिल देशमुख निर्दोष बाहेर येतील असा आम्हा सर्वांना विश्वाास आहे.
नुतन रेवतकर,उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस नागपूर शहर