रुग्णवाहिका वेळीच न मिळाल्याने युवकाचा मृत्यू! दहेगाव (गोसावी) येथे घडली दुर्देवी घटना

केळझर : नजीकच्या दहेगाव (गोसावी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका वेळीच उपलब्ध न झाल्याने गंभीर असलेल्या तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी ही दुर्देवी घटना घडली.

प्राप्त माहिती नुसार दहेगाव (गोसावी) येथील ओम प्रशांत खेकडे याला ताप असल्याने शनिवारी सकाळी तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून उपचार करून घरी आणले. परंतु सायंकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान ओमची प्रकृती पुन्हा बिघडल्याने आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्याला सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्याचा सल्ला कुटुंबीयांना दिला.

सेवाग्रामला नेण्याकरिता ओमच्या कुटुंबीयांनी रुग्णालयाकडे रुग्णवाहिकेची मागणी केली असता ती दुरुस्तीकरिता नेल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यामुळे ओमच्या कुटुंबीयांचा अन्य खाजगी वाहनाची व्यवस्था करण्यात एक ते दीड तास गेला. त्यानंतर वाहनाची व्यवस्था झाल्याने ओमला सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. या दरम्यान ओमचा मृत्यू झाला होता. रुग्णालयातील रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध न झाल्याने ओमला वेळीच उपचार मिळू शकले नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here