मुंबई : राज्यातील सात शहरांसह 14 जिल्ह्यांमधील (ग्रामीण भाग) कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. मृत्यूदरही दोन टक्क्यांवर पोहोचला असून पुन्हा तिसरी लाट आणि डेल्टा प्लस या व्हेरिएंटमुळे टास्क फोर्सने सरकारला सावधानतेचा इशारा दिला. या पार्श्वभूमीवर संबंधित जिल्ह्यातील महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना निर्बंधांचे कडक अंमलबजावणीचे निर्देश दिले आहेत. दुपारी चारनंतर विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई होईल, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग आटोक्यात येऊ लागल्यानंतर राज्य सरकारने कडक निर्बंध पाच टप्प्यांमध्ये शिथिल करण्याचा निर्णय घेतला. परंतु, कोरोना गेला म्हणून अनेकजण विनामास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करताच बाजारपेठा, दुकानांसमोर गर्दी करू लागल्याचे चित्र आहे. त्यातच आंदोलनांचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर तिसरी लाट लवकरच येऊ शकते, अशी भिती टास्क फोर्सने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध कडक करण्याचे राज्य सरकारने निश्चित केले असून हॉटेल, रेस्टॉरंट, स्पा, सलून, ब्युटी पार्लर दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्क्यांच्या क्षमतेने सुरू राहणार आहेत. तर शनिवार, रविवारी शक्यतो दुकाने बंदच ठेवली जाणार असून शाळा, खासगी कोचिंग क्लासेसही बंद राहतील. हे निर्बंध पुढील दोन महिन्यांपर्यंत (सप्टेंबरअखेर) राहतील, असे आपत्ती व्यवस्थापन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांने सांगितले.
‘या’ शहर-जिल्ह्यांना सावधानतेचा इशारा
मुंबई, ठाणे, नवी मुंबई महापालिका, कल्याण डोंबविली, उल्हासनगर, पनवेल, नाशिक महापालिका, धुळे ग्रामीण, पुणे, सोलापूर ग्रामीण, सातारा, कोल्हापूर शहर-ग्रामीण, सांगली, सिंधुदूर्ग, औरंगाबाद मनपा, परभणी, लातूर, बीड, अकोला, बुलडाणा, नागपूर महापालिका, वर्धा, गडचिरोली. या शहर-ग्रामीणमध्ये मागील पाच दिवसांत रुग्णसंख्या थोडीशी वाढल्याची बाब टास्क फोर्सने अधोरेखित केली असून मृत्यूदरही दोन टक्क्यांवर पोहचल्याचे स्पष्ट करीत त्यांनी सरकारला सावधानतेचा इशारा दिला आहे.