वर्धा : मतिमंद मुलीच्या घरात घुसून तिचा विनयभंग करणाऱ्या महादेव नथ्युजी लोखंडे (६६, रा. पंचवटी, ता. आर्वी) याला जिल्हा सत्र न्यायालयाने दंडासह सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. हा निकाल अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांनी दिला.
प्राप्त माहितीनुसार, मतिमंद पीडिता ही घरी एकटीच असल्याचे हेरून आरोपी महादेव याने तिच्या घरात प्रवेश केला. महादेव इतक्यावरच थांबला नाही तर त्याने पैशाचे आमिष देत तिचा विनयभंग केला. आरोपी हा मतिमंद मुलीवर अत्याचार करू पाहत असल्याचे लक्षात येताच पीडितेला आरोपीच्या तावडीतून काहींच्या म्रदतीने सोडविण्यात आले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध आर्वी पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.
आर्वी येथील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक धीरज बांडे यांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. दोन्ही बाजूचा युक्तिवाद, पुरावे तसेच एकूण सहा साक्षदारांची साक्ष लक्षात घेऊन न्यायाधीश सूर्यवंशी यांनी आरोपी महादेव याला भादंविच्या कलम ४५२ नुसार तीन वर्षे सश्रम कारावास व २०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास आठ दिवसांचा सश्रम कारावास, बाल लैगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ नुसार ४ वर्षे २८ दिवसांचा सश्रम कारावास व 3०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास दहा दिवसांचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. शासकीय बाजू अँड. विनय घुडे यांनी मांडली. पैरवी अधिकारी म्हणून अजय खांडरे यांनी काम पाहिले.