समुद्रपुर : तालुक्यातील नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर काही व्यक्तींनी आपण पोलीस असल्याचे सांगून ॲपे चालकाला अडविले. या अज्ञात व्यक्तींनी ॲपे चालकाला वाहनात गांजा असल्याचे सांगत त्याच्याजवळील ५२० रुपये बळजबरी हिस्कावून पळ काढला. या प्रकरणातील चोरट्यांना समुद्रपूर पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय रामदास नांदुरकर (२४),अतुल बबन लाखे (३३) व अमोल हरिभाऊ झोटींग (३०) सर्व रा. जाम असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
गुरूवार २४ रोजी रात्रीच्या सुमारास हिंगणघाट येथील शमशाद मो. मोसलिम ॲपे घेवून हिंगणघाटच्या दिशेने जात होते. उबदा बसस्थानक परिसरात दुचाकीने आलेल्या काहींनी ॲपे थांबविला. आम्ही पोलीस आहोत, तुमच्या वाहनाची तपासणी करायची आहे, असे सांगून ॲपेची झडती घेतली. वाहन तपासणीदरम्यान या आरोपींनी ॲपेत गांजा असल्याचे सांगून शमशाद मो. मोसलिम व राजकुमार ठाकूर यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील पैसे हिस्कावून घटनास्थळावरून पळ काढला.
या प्रकरणी समुद्रपूर पोलीस ठाण्यात तक्रारीवरून गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाला गती देत अक्षय, अतुल व अमोल यांना अटक केली. पुढील तपास समुद्रपूरचे ठाणेदार हेमंत चांदेवार यांच्या मार्गदर्शनात नीलेश पेटकर करीत आहेत.