वर्धा : अनुकंपावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून महिलेसह तिघांनी तब्बळ १० लाख रुपयांनी कुटुंबाला गंडविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सरिता राजेंद्र डहाके रा. सिंदी (मेघे) यांचे पती एरिगेशन विभागात अभियंता पदावर होते. त्यांचे निधन झाल्याने त्यांच्या मुलाला अनुकंपावर नोकरी लावून देतो,असे सांगून प्रश्नांत गावंडे आणि मोहिनी गावंडे यांनी माझी मंत्रालयात ओळख आहे. अनुकंपात मुलाला लावण्यासाठी ७ लाख रुपये लागतील, असे सांगितले. सरिता पैसे देण्यास तयार झाली. सुरुवातीला सरिताने प्रश्नांतच्या खात्यावर १ लाख रुपये पाठविले. त्यानंतर प्रशांत आणि जितेंद्र विरखेडे यांना दागिने दिले. ते गहाण ठेवून ४२ हजार रुपये दिले.
तसेच काही दिवसांनी एका सराफा व्यावसायिकाकडे घर गहाण ठेवून 3 लाख रुपये दिले. तसेच उर्वरित १ लाख ९३ हजारांची रक्कम दिली. असे एकूण ७ लाख रुपये दिले. मात्र, त्यानंतर बराच काळ उलटला तरी नोकरी लागली नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. वारंवार पैसे मागण्यास गेल्या असता पैसे परत केले नाही. त्यानंतर प्रश्नांत आणि मोहिनी यांनी रवींद्र गावंडे यांच्या मुलीलाही नोकरी लावण्याच्या आमिषातून 3 लाखांनी फसविल्याचे समजले. त्यामुळे तिघेही तब्बल १० लाख रुपयांनी फसवणूक करून फरार झाल्याने सरिता यांनी रामनगर पोलिसात तक्रार दिली. पुढील तपास पोलीस करीत आहे.