वर्धा : दुचाकीला मागून धडक देऊन जखमीच्याच गळ्यावर चाकू लावून खिश्यातून २ हजार रुपये हिसकावून नेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही घटना ठाकरे मार्केट परिसरात घडली.
हरिदास विनायक महल्ले (39), रा. आमला (तिगाव) हे दुपारी १२ वाजेच्या सुमारास शिवाजी चौकाकडून बजाज चौकाकडे एम.एच. 3२ ए.ए. ०९१२ क्रमांकाच्या दुचाकीने जात असताना मागून भरधाव आलेल्या एम. एच. 3२ ए. ए. 3०६५ क्रमांकाच्या दुचाकीने धडक दिली. यात दोन्ही दुचाकीवरील तिघे जमिनीवर पडले. दरम्यान दुचाकीवर आलेल्या समीर आणि योगेश नामक युवकांनी गाडीचा खर्च आणि दवाखान्यातील उपचाराचे पैसे दे, असे म्हणून एकाने चाकू काढून हरिदासच्या गळ्यावर लावून दुसऱ्याने शर्टच्या खिश्यातून २ हजार रुपये हिसकावून नेले.
याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल करताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.