वर्धा : आंबिया बहार असलेल्या तळेगाव परिसरातील संत्राबागेतील संत्रा फळांवर सध्या तडक्या रोगाने अटॅक केला असल्याने संत्र्याची यावेळी मोठ्या प्रमाणात गळती होत असल्याने संत्रा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. परिणामी, मेहनतीने पिकविलेला संत्रा मातीमोल होत असल्याचे पाहून त्यांचे अर्थकारण धोक्यात आले आहे.
‘संत्राबेल्ट’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या अमरावती जिल्ह्यातील वरुड-मोर्शी तालुक्याच्या शेजारी लागून असलेल्या आष्टी तालुक्यात बऱ्याच प्रमाणात संत्र्याच्या बागा असून परिसरात संत्र्याचे आंबिया व मृग बहाराची संत्री शेतकरी घेतात. सध्या तळेगावसह परिसरात आंबिया बहाराची संत्राफळे शेतकऱ्यांच्या बागेत असून त्यावर तडक्या रोगाने आक्रमण केले आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे झाडावरील हिरव्या फळांची मोठ्या प्रमाणात गळती होत असून झाडाखाली फळांचा खच दिसून येत आहे.
संत्राफुटीसाठी हजारोंचा खर्च शेतकऱ्यांनी केला. मात्र, आता तडकलेली संत्राफळे झाडांखाली गळून पडल्याने वेचून फेकून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. विशेष म्हणजे तालुक्यात यावर्षी मृगबहार फारच कमी प्रमाणात फुलला. त्यासाठी केलेला खर्चही निघाला नाही. त्यामुळे आंबिया बहराच्या संत्र्यावर शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून होते. कोरोनामुळे देशभरात संत्र्याला मोठी मागणी पाहता यावर्षी चांगले बाजारभाव मिळतील, अशी अपेक्षा असताना तडक्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे परीसरातील शेतकऱ्यांनी तूर, कपासी, सोयाबीनच्या पेरण्या केल्या.
परंतु पावसाने दडी मारल्याने परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. त्यात संत्राफळावर तडक्या रोगाचे आक्रमण झाल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले आहे. त्यामुळे कृषी विभागाने याची दखल घेऊन योग्य त्या उपाययोजना सुचवाव्यात, अशी मागणी तळेगावसह परिसरातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांकडून होत आहे.