

वर्धा : अन्नातून विषबाधा होऊन बहीण-भावाचा मृत्यू झाला. ही घटना पुलगाव नजीकच्या बोदड मलकापूर येथे घडली असून, उन्नती सिद्धार्थ कांबळे (१०) व सम्यक सिद्धार्थ कांबळे (२) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे कांबळे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगरच कोसळला आहे.
वर्धा तालुक्यातील बोदड मलकापूर येथील कांबळे कुटुंबीयांनी एकत्रित जेवण केल्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास उन्नती, सम्यक व आरती सिद्धार्थ कांबळे यांना उलट्या तसेच जुलाबाचा त्रास होऊ लागला. ही बाब लक्षात येताच तिघांनाही सुरुवातीला पुलगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले; पण प्रकृती गंभीर असल्याने सम्यक व सम्यकची आई आरती या दोघांना सेवाग्राम येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तर उन्नतीची प्रकृती ठीक असल्याने तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती.
सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना सम्यक याचा १९ रोजी मृत्यू झाला. तर उन्नतीची २० रोजी अचानक तब्यत खालावल्याने तिला सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान उत्नतीचाही मृत्यू झाला. तर आरती कांबळे यांच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली असून, नेमकी विषबाधा कशी झाली, याचा शोध पोलीस घेत आहेत.