मुंबई : महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शिष्टमंडळाने काही दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. मात्र या भेटीदरम्यान उद्घव -मोदी यांच्यामध्ये अर्धा तास वैयक्तिक भेटीची चर्चा रंगली होती. राजकीय मतभेद असले तरी मनाने आम्ही एकत्र आहोत, असे ठाकरे म्हणाले. त्यानतंर आज शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत भाजपशी जुळवून घ्या असं सांगितल. या सगळ्या परिस्थितीत महाविकासआघाडीत बिघाड होऊन महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीची चर्चा चालु झाली आहे आणि तिकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीला गेले आहेत.
शरद पवार दिल्लीला का गेले ?
महाराष्ट्रात राजकीय उलथापालथीची चर्चा होत असताना पवारांचा दिल्ली दौरा चर्चेत आला आहे.मात्र शरद पवार हे केरळमधील प्रमुख नेत्यांशी दिल्लीत भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, मोदी-ठाकरे भेटीच्या पार्श्वभूमीवर पवारांचा हा दिल्ली दौरा महत्वाचा मानला जात आहे. आपल्या दिल्ली दौऱ्यात पवार कोणत्या नेत्यांना भेटणार याकडे राजकीय वर्तुळासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.पवार मोदींना भेटणार का अशा चर्चा देखील रंगल्या आहेत .
पवारांकडून शिवसेनेचं तोंडभरुन कौतुक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनी शरद पवार यांनी शिवसेनेचं तोंडभरुन कौतुक केलं होतं. त्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची पार्श्वभूमीवर होती. कुणी काहीही शंका घेतली तरी शिवसेनेनं ज्या पद्धतीने, ज्या कालखंडात ही ठाम भूमिका घेतली, ती भूमिका ते बदलतील असे आडाखे कुणी बांधत असेल तर ते वेगळ्या नंदनवनात राहतात, एवढंच मी सांगेल. हे सरकार ५ वर्षे टिकेल, काम करेल. फक्त ५ वर्षे नाही तर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत अधिक जोमाने एकत्र काम करुन सामान्य जनतेचं प्रभावीपणे देशात आणि राज्यात प्रतिनिधित्व करेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही”, असं भाकीतही पवारांनी त्यावेळी केलं होतं.