यवतमाळ : मारेगाव वनपरिक्षेत्रात २३ मार्च २०२१ रोजी व मुकुटबन वनपरिक्षेत्रात २५ एप्रिल २०२१ रोजी वाघाची शिकार केल्याच्या घटना घडल्या होत्या. या घटनांमधील आरोपींना शनिवारी अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पांढरकवडा वनविभाग व वणी पोलिस उपविभागाने संयुक्तपणे केली. याप्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
कारवाईत मुकुटबन वनपरिक्षेत्रातील शिकार प्रकरणातील आरोपी नामे नागोराव भास्कर टेकाम, सोनू भवानी टेकाम, गोली रामा टेकाम, बोनू तुकाराम टेकाम, तुकाराम भवानी टेकाम (सर्व, रा. वरपोड ता. झरी) यांना वरपोड येथून अटक करण्यात आली. मारेगाव वनपरिक्षेत्रातील शिकार प्रकरणातील संशयित आरोपी दौलत भीमा मडावी, मोतीराम भितू आत्राम, प्रभाकर महादेव मडावी (सर्व, रा. येसापूर ता. झरी) यांना येसापूर येथून अटक करण्यात आली आहे.
मारेगाव वाघ शिकार प्रकरणातील आरोपींच्या घराची झडती घेतली असता वन्यप्राण्याचे मांस तसेच शिकार करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करू त्यांना न्यायालयापुढे हजर करण्याची कार्यवाही सुरू होती. सदरची कार्यवाही किरण जगताप (उपवनसंरक्षक, पांढरकवडा वनविभाग पांढरकवडा) यांच्या मार्गदर्शनात एस.आर. दुमारे, सहा. वनसंरक्षक (जंकास व कॅम्पा, पांढरकवडा), विक्रांत खाडे, विजय वारे, माधव आडे, रणजित जाधव, संगीता कोकणे, तुळशीराम साळुंके, सुनील मेहरे, आशिष वासनिक, गेडाम, सोनडवले, सर्व वनपरिक्षेत्र अधिकारी व सोनुने पोलिस निरीक्षक मुकुटबन, संगीता हेलोंडे सहा. पोलिस निरीक्षक पाटण, तसेच इतर पोलिस व वन अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडली.