वर्धा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत किडनीचे नुकसान अधिक प्रमाणात समोर येत असल्याने किडनीचा आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचा सल्ला नेफ्रोलॉजिस्टनी दिला आहे.
कोरोनामुळे किडनीवर होणारा परिणाम हा साधारणत: रुग्णाच्या अगोदरच्या फंक्शन्सवर अवलंबून असतो. ज्या रुग्णाला पूर्वी किडनीविषयी कुठलाही आजार नाही व इतर व्याधी जसे मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयरोग, यकृताचा आजार आदी नसल्यास किडनीवर परिणाम कमी होतो. याउलट ज्यांचे वय अधिक आहे, ज्यांना किडनीचा जुनाट आजार आहे, मधुमेह, हायपरटेन्शन, हृदयरोग आदी आजार आहेत आणि ज्यांना गंभीर स्वरूपाचा कोरोना संसर्ग झाला अथवा व्हेंटिलेटरची गरज भासली, त्यांच्या किडनीवर अधिक परिणाम होतो.
हा परिणाम साधारणत: दोनप्रकारे होतो. पहिला तीव्र स्वरूपाचा किडनीचा आजार (अॅक्युट किडनी इंज्युरी) होतो. दुसरा दीर्घकालीन (क्रोनिक किडनी डिसीज) आजार वाढू शकतो. तीव्र स्वरूपाचा किडनीचा आजार साधारणत: ३० ते ४० टक्के कोरोनाच्या रुग्णांमध्ये पाहायला मिळतो. यातील २५ टक्के रुग्णांना डायलिसीसची गरज भासते. साधारणत: २० ते २५ टक्के रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. तसेच ज्या कोरोनाबाधित रुग्णांचा सीटीस्कोअर १५ च्यावर वर आहे आणि फुफ्फुसात ५० टक्क्यांवर इन्फेक्शन झालेले आहे, अशा रुग्णांमध्ये किडनीचा आजार पाहायला मिळतो. जिल्ह्यात यंदाही मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाबाधित आणि मृत्यूसंख्या वेगाने वाढलेली पाहायला मिळाली. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ४९ हजार ४३ असून, ४७ हजार ४१८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३०९ रुग्ण उपचार घेत आहेत, तर मृत्यूसंख्या १३१६ आहे. दुसऱ्या लाटेत बहुतांश रुग्णांच्या किडनीचे नुकसानीची बाब पुढे आली. त्यामुळे योग्य उपचार करून घ्यावेत.
किडनीचा रुग्ण पॉझिटिव्ह आल्यास…
हकिडनीचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यास घाबरून न जाता लगेच किडनीरोगतज्ज्ञांची भेट घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत.हकोरोनाची चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णालयात गरज असेल तरच दाखल व्हावे. हमास्क, सॅनिटायझर, वारंवार हात स्वच्छ धुणे या कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे. जे रुग्ण डायलिसीसवर आहेत, त्यांनी न चुकता नियमित डायलिसीस करावे. तरच मूत्रपिंड विकारावर सहज मात करता येईल.
हे करा
किडनीचा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्यास घाबरून न जाता लगेच किडनीरोगतज्ज्ञांची भेट घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत. कोरोनाची चाचणी करून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रुग्णालयात गरज असेल, तरच दाखल व्हावे. मास्क, सॅनिटायझर, वारंवार हात स्वच्छ धुणे या कोरोना त्रिसूत्रीचे काटेकोर पालन करावे. जे रुग्ण डायलिसीसवर आहेत, त्यांनी न चुकता नियमित डायलिसीस करावे.
हे करू नका
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मूत्रपिंड विकार असलेल्या रुग्णाने कोणत्याही प्रकारची औषधी घेऊ नये. कोरोनाची चाचणी करायला अथवा दाखल व्हायला टाळाटाळ करू नये. आहारातील मिठाचे प्रमाण कमी करा, फास्ट फूड टाळा, सकस आणि समतोल आहार घ्यावा. धूम्रपान आणि मद्यपान प्रकर्षाने टाळा, रक्तदाब आणि मधुमेह असल्यास अधिक काळजी घ्या. ठराविक अंतराने तपासणी नियमित तपासणी करावी.