वर्धा : किराणा दुकान चालविणाऱ्यास शिवीगाळ करीत दगडाने मारहाण करीत दुकानातील साहित्याची फेकाफेक केली. नागसेननगर परिसरात ही घटना घडली.
सचिन राधेश्याम विश्वकर्मा हा किराणा दुकान चालवितो. त्याने सकाळी दुकान उघडले असता विनोद शेंडे याने दुकान का उघडले, असे म्हणत शिवीगाळ केली. शिवीगाळ करण्यास हटकले असता विनोदने दगड फेकून मारला.
इतकेच नव्हे तर त्याच्या दुकानात जात काउंटरला लाथा मारून साहित्याची फेकाफेक केली. यात सचिनचे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सध्या हाणामारीच्या घटनांनी डोकेवर काढले असून पोलिसांचा धाक कमी होत चालल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी अशावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.