रत्नागिरी : समुद्रातील माशांचा साठा कमी होत असून तो सध्या ६६ टक्केवर पोचला आहे. त्याला मानवी हस्तक्षेपाबरोबरच नैसर्गिक बदलही कारणीभूत आहेत. खोल समुद्रातील ऑक्सिजन कमी असलेला झोन प्रवाहाबरोबर किनाऱ्याकडे येतो. त्यामुळे मासे स्थलांतर करतात आणि त्याचा परिणाम मत्स्योत्पादनावर होऊ शकतो, असे प्रतिपादन नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. अभय बी. फुलके यांनी केले.
जागतिक महासागर दिनानिमित्त रिलायन्स फाउंडेशन, भारतीय तटरक्षक दल आणि राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युट्युब लाइव्ह कार्यक्रमात ते
बोलत होते. याप्रसंगी डॉ. फुलके यांनी जीवन व उपजीविका, सागराचे महत्त्व, महासागराचे प्रदूषण व उपाय तसेच मत्स्यसाठा कमी होण्याचे नैसर्गिक कारणे या विषयी मार्गदर्शन केले.
ते म्हणाले, की समुद्रातून ५० टक्के तर उर्वरित झाडांपासून ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे दैनंदिन जीवनात झाडांचे आणि समुद्राचे महत्त्व अधिक आहे. सागरी किनाऱ्यावरील मच्छीमार बंधूनी किनारे सुरक्षित ठेवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. प्रदूषणाला आळा घालण्यासाठी तेथील वातावरण शुद्ध ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सागरी वातावरण शुद्ध राहीले तर मत्स्योत्पादनात भर होऊ शकते. मत्स्योत्पादन कमी होण्यासाठी नैसर्गिक आणि मानवनिर्मित कारणे आहेत.
नैसर्गिक कारणांमध्ये ऑक्सिजन कमी असलेला झोन मासे मिळणाऱ्या भागांमध्ये येणे याचा समावेश आहे. खोल समुद्रात हजारो किलोमीटरवर कमी ऑक्सिजन असलेले झोन आढळतात. ते पाण्याच्या प्रवाहाबरोबर किंवा हवेमुळे किनाऱ्याकडे येतात. नियमित मासे सापडणाऱ्या किनारी भागात तो आला तर त्याचा प्रभाव माशांवर होतो. त्यामुळे दरवर्षी मासे मिळणाऱ्या किनारी भागात ते मिळत नाहीत. माशांना ऑक्सिजन कमी मिळत असल्यामुळे ते अन्यत्र
निघून जातात.