सेलू : बोरी बोरधरण येथील माॅ दुर्गा दारूबंदी महिला मंडळाने जीव धोक्यात घालून दारूभट्टीवर छापा मारुन दारूभट्टी उदध्वस्त केली. संतप्त दारूभट्टीचालकाने या महिला मंडळ व त्यांना मदत करणाऱ्या काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ करीत मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे जीवावर उदार होऊन दारूबंदीचे कार्य करणाऱ्या महिलांचे मनोबल खच्ची होत आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
अवैध गावठी दारूभट्टीचे प्रमाण सर्व गावांत मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक गावांत तेथूनच मोठ्या प्रमाणात पुरवठा होतो. दारूच्या व्यसनामुळे गावकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. मुलाबाळांची वाताहत झाली. त्यामुळे दारूबंदी महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना सोबत घेत दारूभट्टीवर धाड घातली. यावेळी त्या परिसरात त्यांना दारूच्या तीन भट्ट्या सुरू दिसल्या. या तीनही भट्ट्या उद्ध्वस्त केल्या.यापैकी एका दारूभट्टीचालकाने मारण्याचा प्रयत्न केला.
महिलांनी चालू भट्टी पकडल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक नलावडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एका अवैध दारूभट्टीचालकाला ताब्यात घेतले. मात्र, इतरांवर कोणतीच कारवाई केली नाही, असा महिलांचा आरोप आहे. अवैध दारू गाळणारे निर्ढावळे असल्याचा आरोपही महिला मंडळाने केला आहे. महिला मंडळाच्या कार्यकर्त्या बहिणा वाघाडे, मीरा किरडे, प्रेमिका वाघाडे, शांता खंडाते, कांता नेहारे तसेच रवी धूर्वे, गोविंद पेटकर, प्रकाश्च सरमाके, प्रश्नांत ठाकरे, सुधाकर किरडे, अमोल वाघाडे यांनीही दारूभट्टी उद्ध्वस्त करण्यासाठी मोलाची कामगिरी केली. पोलीस पाटील विकास कोकाटे हे खुद्धा कारवाईच्या वेळेस उपस्थित होते.