वर्धा : आधीच वाढत्या महागाईने सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. अश्यातच खाद्यतेलाच्या किंमती आणि धान्याच्या किंमतीचे दर गगनाला भीडले असतानाच घरातील खाद्यतेलासह तूर, चणा डाळ आणि कणिक चोरट्याने चोरून नेल्याने ऐन दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती नालवाडी येथील मिलींदनगर परिसरातील रहिवासी संजिवनी सतीश चिचाटे कुटंबावर आली आहे.
संजिवनी चिचाटे ही रोजमजुरीचे काम करते. सुमारे चार महिन्यापासून त्या कुटुंबासह चाणकी कोपरा येथील रहिवासी तिच्या आईकडे मुक्कामाला आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास त्या वीज देयक भरण्यासाठी मिलींदनगर येथील घरी गेल्या असता त्यांना मागील दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांनी घरात जात पाहणी केली असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त दिसून आले.
इतकेच नव्हे तर पाच किलो तूर डाळ, पाच किलो साखर, दहा किलो तांदूळ, सोयाबीन तेल, अर्धा किलो चहापत्ती, दोन बॅग कणिक, टिव्हीवरील सेटअपबॉक्स, तसेच डाळीच्या डळ्यात ठेवलेले १० हजार रुपये रोख असा एकूण १३ हजार रुपयांचा धान्यसाठा चोरुन नेलेला दिसून आला. याप्रकरणी संजिवनी चिचाटे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली असून पुढील तपास शहर पोलीस करीत असुन चोरट्याचा शोध सरु आहे.