केळझर : जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी मंगळवारी येथे भेट देत कोरोना लसीकरणाचा आढावा घेतला. यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. सचिन ओंबासे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार महेंद्र सोनोने, गटविकास अधिकारी पडघम, पंचायत समिती सभापती अशोक मुडे, जि. प. सदस्य विनोद लाखे,सरपंच अर्चना लोणकर,उपसरपंच सुनील धुमोने, आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी, ग्रामविकास अधिकारी सुनील गावंडे आदी उपस्थित होते.
येथील सिद्धीविनायक गणपती मंदिराच्या सांस्कृतिक सभागृहात आयोजित आढावा सभेत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी लसीकरणाचे काम प्रभावीपणे राबवून शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचारी तसेच ग्रामपंचायतीला केल्या. कोरोनाची तिसरी लाट लहानग्यांकरिता धोकादायक ठरण्याची शक्यता त्यांनी वर्तविली.
त्यामुळे गावातील ४५ वर्षावरील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या कोरोना लसीकरणाला वेग देण्याच्या सूचना दिल्या. सर्वांनी मिशन मोडमध्ये काम करायचे असल्याचे सांगितले. याप्रसंगी आशा वर्कर व अंगणवाडी वर्कर्स यांनी चांगले काम केल्याचा उल्लेख करीत त्यांच्या कार्याची प्रशंसा केली. येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या डॉ. छाडी यांनी गावात आतापर्यंत ४५ वर्षावरील नागरिकांचे कोरोनाच्या पहिल्या डोसचे ६१ टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे सांगितले. या आढावा बैठकीला आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर, ग्रा. पं. सदस्य,पोलीस पाटील, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष उपस्थित होते.
पशुवैद्यकीय दवाखान्याकरिता जागेची मागणी
गावात पशुवैद्यकीय दवाखाना असून कित्येक वर्षापासून भाड्याच्या खोलीतून दवाखान्याचे कामकाज सुरू आहे. जागा अपुरी पडत असल्याने पशु पालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. दवाखान्याच्या बांधकामाकरिता निधी मंजूर आहे. परंतु ग्रामपंचायतीकडे जागा उपलब्ध नसल्याने बांधकाम रखडले आहे. त्यामुळे शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य विनोद लाखे व सरपंच अर्चना लोणकर यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यावर सकारात्मक विचार करून असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.