

मिनाक्षी रामटेके
वर्धा : दिवस शुक्रवारचा… नेहमीप्रमाणात शहरात वर्दळ होती. बॅंकही सुरू होती. बॅंकेत नागरिकांची गर्दी होती. नागरिकांचे व्यवहार सुरू असतानाच एक जण बॅंकेत शिरला. त्याने अंगाला बाँम्ब लावला होता. त्याला पाहून नागरिकांची पळापळ सुरू झाली. अंगाला बाँम्ब लावल्याचे पाहून नागरिक घाबरून गेले आणि इकडेतिकडे पळू लागले. अशात सुसाईड बॉम्बर बनून आलेल्या व्यक्तीने धमकीपत्र देऊन पैशांची मागणी केली. योगेश कुबडे असे सुसाईड बॉम्बरचे नाव आहे.
वर्धा येथील सेवाग्राम पोलिस ठाण्यासमोरच सेंट्रल बँक ऑफ इंडिया आहे. या बँकेत तोंडाला कापड गुंडाळून आलेल्या इसमाने बँक शिपायाच्या डोक्यावर एअर पिस्तूल लावून धमकी देत पैशांची मागणी केली. पुढे त्याला घेऊन येत पिस्तूल लपवून ठेवली अन् पत्र त्याला दिले. शिपायाने ते पत्र बँकेच्या अधिकाऱ्याला दिले. बँकेच्या व्यवस्थापकांनी तक्रार समजून पत्र वाचले. त्यातील मजकूर वाचून अधिकाऱ्याला धक्काच बसला.
पत्रात आजारावर उपचारासाठी ५५ लाखांची गरज आहे. मी सुसाईड बॉम्बर आहे. बँकेत येताच बॉम्ब अॅक्टीव्ह केलेला आहे. सिक्युरिटी अलार्म वाजवला किंवा पोलिसांना बोलावू नका, अन्यथा सर्वांना उडवून देईल, अशी धमकी लिहिली होती. बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी समयसूचकता दाखवत पोलिसांना सुसाईड बॉम्बर शिरल्याची माहिती दिली.
बँकेत सुसाईड बॉम्बर शिरल्याची माहिती मिळताच पोलिस कर्मचाऱ्यांनी बँकेकडे धाव घेतली. पोलिसांनी बँकेत प्रवेश केल्यानंतर योगेश कुबडे याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला. पोलिसांनी कुठलाही वेळ न दवडता योगेशला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडील कमरलेला गुंडाळलेले बनावट बॉम्ब सदृष्य साहित्य, चाकू, एअर पिस्टल जप्त केले.
कमरेला गुंडाळलेल्या सहा लालसर रंगाच्या पाइपच्या कांड्या, वायर, छोटी डिजिटल वॉच जोडलेली बॉम्ब सदृश्य दिसेल असे तयार केले होते. त्यात विस्फोटक नव्हते. प्लॅस्टिकच्या पाइपमध्ये पीओपी भरले होते. पाहणाऱ्यांना ते बॉम्बसदृष्य दिसत होते. त्याने बनावट पिस्तूल ऑनलाइन बोलावल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.