मिनाक्षी रामटेके
वर्धा : अरबी समुद्राचा पूर्वमध्य भाग व कर्नाटक राज्याची किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्याची स्थिती तयार झाल्याने नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. शनिवारी (ता. २९) श्रीलंका, मालदीव व कोमोरीनच्या अनेक भागांत मॉन्सून व्यापला आहे. उद्या (सोमवारी) मॉन्सून केरळात दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.
अंदमान बेटांवर २१ मे रोजी मॉन्सून दाखल झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वेगाने सरकत मॉन्सूनने संपूर्ण अंदमान, निकोबार बेटसमूह व्यापला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढची वाटचाल करत आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या प्रवाहाच्या दरम्यान मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडत आहे. मागील तीन दिवसांपासून श्रीलंका, मालदीव व कोमोरीन भागांत नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) दाखल झाले आहेत. या भागांत व्यापण्यास पोषक वातावरण असल्याने बहुतांशी भागात व्यापला आहे. आज (रविवारी) आणखी काही भागांत मजल मारण्याची शक्यता असून, उद्या केरळमध्ये दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
सध्या अरबी समुद्राच्या दक्षिण भाग व मध्य भागात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. तसेच मध्य प्रदेशाच्या आग्नेय भाग व परिसर ते तमिळनाडूचा दक्षिण भाग, विदर्भ, तेलंगाणा आणि रायलसीमा या भागात कमी दाबाचा पट्टा असून, त्याचे चक्रीय वाऱ्यांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. ही स्थिती मॉन्सूनला पुढे वाटचाल करण्यासाठी पोषक आहे. त्यामुळे मॉन्सून लवकरच टप्प्याटप्प्याने राज्यात दाखल होईल.