मिनाक्षी रामटेके
वर्धा : गेल्या हंगामात सोयाबीनच्या कापणीच्या वेळेस पाऊस पडल्यामुळे सोयाबीनच्या बियाण्यामध्ये अंकुरण झाले. या अंकुरलेल्या सोयाबीनची मळणी झाली. यामुळे सोयाबीनची उगवण क्षमता कमी राहणार आहे. त्यामुळे यंदा पुन्हा शेतकऱ्यांना सोयाबीनचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पिकाची फेरपालट करून जमिनीची सुपीकता वाढविण्याचे दृष्टीने इतर पिकांची लागवड करावी, असे आवाहन आत्माच्या प्रकल्प संचालक डॉ. विद्या मानकर यांनी केले आहे.
डॉ. मानकर म्हणाल्या, की शेतकऱ्यांना सोयाबीन पिकाऐवजी तूर, मूग, उडीद व हळद आदी पिके घ्यावे. कोणत्याही काळ्या, भारी जमिनीत तूर पीक चांगले येईल. परंतु यामध्ये सोयाबीन पीक हे आंतरिक पीक म्हणून घेण्याची इच्छा असल्यास ते आंतरिक पीक घेता येईल. यासाठी सोयाबीनचे बियाणे कमी लागेल व जे एस.३३५ चे बियाणेसुद्धा वापरण्यास हरकत नाही. ज्यांच्याकडे सोयाबीन बियाणे आहे. त्यांनी बियाण्याची उगवणक्षमता तपासून ते पेरणीयोग्य असल्यास बीबीएफ, रुंद सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी. ज्यामुळे २२ किलो बियाण्यामध्ये एक एकर पेरणी होईल आणि बियाण्याची बचत होईल. ज्यांच्याकडे बीबीएफ यंत्र नाही त्यांनी रुंद वरंबा व सरी काढून पेरणी करावी किंवा प्रत्येक ६ ओळींनंतर ३ फूट पट्टा सोडावा. यामुळे कोणत्याही फवारणीसाठी शेतात फिरता येईल. जमीन हलकी असल्यास कमी कालावधीचे पीक मूग किंवा उडीद घ्यावे. हे पीक घेताना सरी वरंबा पद्धतीने ३० ते ४५ सेमी एवढे अंतर दोन ओळींत ठेवून १० ते १५ सेमी अंतर हे दोन झाडांमध्ये ठेवावे. सुयोग्य वाण-मूग-कोपरगाव, पीकेवी-गोल्ड, पिकेवी -मूग, तर उडीद पिकासाठी टी-९, टीएयू-२,४ किंवा पिकेवी उडीद-१५ हे पीक खरिपात जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पेरणीसाठी योग्य राहील. दोन्ही पिकांची पेरणी करावी. या वर्षी ज्या गावांमध्ये हळद बेणे उपलब्ध आहे तिथे हळद पीक लागवड केल्यास उत्पन्न वाढेल. ज्या शेतकऱ्यांकडे ओलीताची सोय आहे त्यांनी आडसाली उसाची लागवड करावी.
उगवणक्षमता तपासावी
ज्या शेतकऱ्यांना कुठल्याही परिस्थिती सोयाबीन पीक लागवड करायची आहे त्यांनी बियाणे खासगी कंपन्यांकडून किंवा कृषी सेवा केंद्रांतून खरेदी केलेले असल्यास त्याची उगवणशक्ती तपासूनच पेरणी करावी. तसेच पेरणी केलेल्या बियाण्याचे बिल, पिशवी, टॅग इत्यादी वस्तू सांभाळून ठेवावे. अन्यथा, मागील वर्षातील परिस्थिती पुन्हा उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे कृषी विभागाने कळविले आहे.