मिनाक्षी रामटेके
वर्धा : राज्यात कोरोनाचा कहर वाढला असताना आणखी एका औषधीसाठी हाहाकार उडाला होता, ते म्हणजे रेमडेसिव्हिर इंजेक्शन. काळ्या बाजारात ३० ते ४० हजार रुपयांपर्यंत या इंजेक्शनची विक्री केली गेली. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी वर्धा येथील जेनेटिक लाइफ सायन्सेसला रेमेडेसिव्हिर इंजेक्शन तयार करण्याची परवानगी मिळवून दिली होती. त्यानंतर आता म्युकरमायकोसिस हा आजार बळावत असताना ‘जेनेटिक’ यावर प्रभावी असलेल्या ॲम्फोटेरीसीन बी या इंजेक्शनचीही निर्मिती करणार आहे.
रेमडेसिव्हिर इंजेक्शनची तातडीने निर्मिती करून त्याचा तुटवडा दूर करणाऱ्या वर्धा येथील जेनेटिक लाइफ सायन्सेस कंपनीला आता काळ्या बुरशीवर (म्युकरमायकोसिस) प्रभावी ठरणाऱ्या ॲम्फोटेरीसीन बी इंजेक्शन निर्मिती करण्याची परवानगी मिळाली आहे. सध्या बाजारात या इंजेक्शनची किंमत सात हजार रुपये असून जेनेटिक लाइफ सायन्सेस ते फक्त बाराशे रुपयांमध्ये उपलब्ध करून देणार आहे.
राज्यातील अन्न व औषध प्रशासन विभागाने याला मंजुरी दिली आहे. कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिव्हिरचा राज्यात मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर दोन ते तीन हजारांचे इंजेक्शन तीस ते चाळीस हजार रुपयांमध्ये विकले जात होते. अनेक दलाल आणि खासगी इस्पितळातील कर्मचाऱ्यांना या इंजेक्शनची चढ्या दराने विक्री करताना अटकही झाली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेऊन वर्धेतील जेनेटिक कंपनीला तातडीने रेमडेसिव्हिरची निर्मिती करण्यास सांगितले होते आणि याकरिता लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळवून दिल्या. आता वर्धेतील रेमडेसिव्हिर संपूर्ण राज्याला उपलब्ध करून दिले जात आहे.
कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये आता बुरशीचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे. काहींना डोळे गमवावे लागले असून काही रुग्णांचा त्यामुळे मृत्यूसुद्धा झाला आहे. याच्या उपचारासाठी लागणाऱ्या ॲम्फोटेरीसीन बी इंजेक्शनचा तुटवडा जाणवू नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने जेनेटिक लाइफ सायन्सेसला उत्पादनाची परवानगी दिली आहे. येत्या पंधरा दिवसांत या इंजेक्शनचे उत्पादन सुरू होणार आहे.
सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या या इंजेक्शनची किंमत सात हजार रुपये आहे. एका रुग्णाला चाळीस ते पन्नास इंजेक्शन दिले जातात. याशिवाय बुरशीचा संसर्ग वाढत चालल्याने भविष्यात मोठा तुटवडा जाणवण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने निर्मितीची परवानगी देण्यात आली आहे. वर्धेत दर दिवशी २० हजार इंजेक्शन निर्मितीची क्षमता असून ते फक्त बाराशे रुपयांमध्ये रुग्णांना उपलब्ध होणार आहे.