हिंगणघाट : येरला येथील गीमाटेक्स इंडस्ट्रीज या कंपनीला रविवारी दुपारी दीड वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत कॉटन बेल्स, सरकी, मशिनरी सह कंपनी आगीच्या विळख्यात सापडली. अग्निशमन दलाच्या पाच बम्बद्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्याच शर्थीचेे प्रयत्न सुरू आहे. या आगीत आगीत अंदाजे २० ते २५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
आग लागली त्यावेळी जिनिंग खात्यात १३ कामगार काम करीत होते. हे सर्व कामगार प्रसंगवधान राखल्याने थोडक्यात बचावले. हिंगणघाटपासून २५ किलोमीटर अंतरावर वडकी जवळील येरला शिवारात राष्ट्रीय महामार्गावर गीमाटेक्स इंडस्ट्रीजचे जिनिंग युनिट आहे. आधुनिक यंत्रसामुग्रीने अद्ययावत ही कापसावर प्रक्रिया करणारी कंपनी चार वर्षांपूर्वी येरला येथे स्थापन करण्यात आली.
चालू कापसाचा हंगाम संपल्याने १२ तारखेला हे युनिट बंद करण्यात येणार होते. दरम्यान आज अचानक कंपनीतील सरकीने पेट घेतला. काही समजण्याच्या आतच आगीने भडका घेतला. यात कंपनी आगीच्या विळख्यात सापडली. आगीत कंपनीतील ७,५०० कापसाच्या गाठी, ४५० टन सरकी आणि मशीन आदी साहित्य भस्मसात झाले.
हिंगणघाट अग्निशमनदल सह यवतमाळ, वणी, उत्तम गल्वा या दलाचे एकूण पाच अग्निशामन बंब आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयन्त करीत आहे. मात्र, अद्याप आग आटोक्यात न आल्याने पुलगाव येथून चार अग्निशामन बंब बोलाविण्यात आलेले आहे. आगीचे लोळ राष्टीय महामार्गाने दूरवर दिसून येत आहे.
आगीची माहिती मिळताच तहसीलदार श्रीराम मुंधडा, नायब तहसीलदार पठाण, वडनेरचे ठाणेदार राजेंद्र शेट्ये, गीमाटेक्सचे फॅक्टरी मॅनेजर शाकीरखा पठाण, पोलिस दलाचे अमित नाईक, मसराम, प्रावीण बोधाने आदी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनेची वडनेर पोलिसात तक्रार करण्यात आली असून तपास सुरू आहे.