वर्धा : दंड भरण्यास नकार दिल्याने शेतकर्याला ठाणेदारासह पोलीस कर्मचाऱ्यांनी जबर मारहाण केली. या घटनेची चौकशी करून सेलू येथील ठाणेदारांसह कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित शेतकरी आणि डेबूजी युथ ब्रिगेडने केली आहे.
सेलू तालुक्यातील वडगाव कला येथील शेतकरी मनोहर हिवरकर आपल्या शेतातून सायंकाळच्या सुमारास घराकडे परतत होते. संताजी मंगल कार्यालयाजवळ ठाणेदार सुनील जाडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हिवरकर यांना अडवून गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. ते एवढ्यावरच थांबले नाही, तर गाडीची चावी काढून कागदपत्रे आणण्यास सांगितली. हिवरकर यांनी घरून कागदपत्र आणल्यावर त्यांना दंडाची मागणी करण्यात आली. मात्र, त्यांनी शेतातून घरी जात असल्याने आणि कुठलाही दोष नसल्याने २०० दंड देण्यास नकार दिला. यावेळी ठाणेदार सुनील गाडे यांनी त्यांच्या कानशिलात लगावली. यात हिवरकर लेतच असलेल्या दुभाजकावर पडले. त्यांनी आरडाओरड केली असता ठाणेदारांच्या सहकारी कर्मचाऱ्यांनी त्यांना जबर मारहाण केली.
गाडीत बसवून ठाण्यात नेले आणि सोडून दिले. यात हिवरकर यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे शेतीकामे करणे अवघड झाले आहे. या घटनेची सखोल चौकशी करून ठाणेदारांसह कर्मचाऱ्यांवर कारवार्ड करावी, अशी मागणी मनोहर हिवरकर यांच्यासह डेबूजी यूथ ब्रिगेडने पोलीस अधीक्षकांना सादर केलेल्या निवेदनातून केली आहे. कारवाईकडे शेतकरीबांधवांसह नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.